मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर सोमवारी घेणार मंत्रिमंडळाची बैठक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2018 12:56 PM2018-12-14T12:56:26+5:302018-12-14T12:57:05+5:30
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे येत्या सोमवारी त्यांच्या करंजाळे येथील निवासस्थानी मंत्रिमंडळाची बैठक घेण्याची दाट शक्यता आहे.
पणजी : मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे येत्या सोमवारी त्यांच्या करंजाळे येथील निवासस्थानी मंत्रिमंडळाची बैठक घेण्याची दाट शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांनी तशी कल्पना कृषी मंत्री तथा गोवा फॉरवर्डचे नेते विजय सरदेसाई यांना दिली आहे. मंत्री सरदेसाई हे दुबईच्या दौ-यावर गेले आहेत. निघण्यापूर्वी त्यांनी गुरुवारी करंजाळे येथे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पर्रीकर यांची भेट घेतली. आपण सोमवारी घरी मंत्रिमंडळाची बैठक घेऊ इच्छितो, असे पर्रीकर यांनी सरदेसाई यांना सांगितले. सरदेसाई यांनी त्यावर सकारात्मक प्रतिक्रिया दिली. आपण दुबईला जात असल्याने कदाचित सोमवारी बैठकीला उपस्थित राहू शकणार नाही, पण तुम्ही मंत्रिमंडळ बैठक घ्या, असे सरदेसाई यांनीही पर्रीकर यांना सुचविले.
पर्रीकर यांनी यापूर्वीही एकदा त्यांच्या खासगी निवासस्थानी मंत्रिमंडळाची बैठक घेतलेली आहे. त्यांनी भाजप आमदारांचीही स्वतंत्र बैठक घेतली होती. आता दुस-यांदा ते मंत्रिमंडळाची बैठक आपल्या घरी घेतील. मुख्यमंत्र्यांच्या आरोग्याचा विषय अगोदरच न्यायालयात पोहचलेला आहे. न्यायालयात त्याविषयीची याचिका आहे. तथापि, पर्रीकर मंत्री, आमदार, अधिकारी यांच्या बैठका घेतात व त्यामुळे प्रशासन ठप्प झालेय असे म्हणता येत नाही, असे सरकारचे म्हणणे आहे. सरकारने न्यायालयासमोरही आपले म्हणणे ठेवलेले आहे.
मंत्रिमंडळाच्या यापूर्वीच्या बैठकीत काही मोठे प्रस्ताव मंजूर झाले नव्हते.
तथापि, यावेळी काही महत्त्वाचे प्रस्ताव चर्चेला येण्याची शक्यता आहे. सरकारमधील काही मंत्रीही पर्रीकर यांना भेटू इच्छीत आहेत. मंत्रिमंडळ बैठक ही अशा मंत्र्यांसाठी एक संधी असेल. पर्रीकर यांची प्रकृती आता पूर्वीच्या तुलनेत सुधारली आहे. त्यांची वैद्यकीय तपासणी सातत्याने होत असते, असे सूत्रांनी सांगितले. सरकारमध्ये नेतृत्व बदल होईल अशी चर्चा असली तरी, पर्रीकर व सरदेसाई यांच्यात चर्चा झाली तेव्हा पर्रीकर यांनी मात्र तूर्त बदल नाहीत, असे संकेत सरदेसाई यांना दिल्याचे सूत्रांनी सांगितले.