मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर 8 सप्टेंबरला गोव्यात परतणार - भाजपा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2018 07:16 PM2018-08-31T19:16:08+5:302018-08-31T19:16:25+5:30
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे अमेरिकेहून उपचार घेऊन येत्या 8 सप्टेंबरला गोव्यात परततील, असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी शुक्रवारी येथे जाहीर केले.
पणजी : मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे अमेरिकेहून उपचार घेऊन येत्या 8 सप्टेंबरला गोव्यात परततील, असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी शुक्रवारी येथे जाहीर केले.
प्रारंभी मुंबईतील लिलावती इस्पितळात उपचार घेणारे मनोहर पर्रीकर हे मुंबईहून गुरुवारी पहाटे अमेरिकेत दाखल झाले. त्यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी उपेंद्र जोशी हेही आहेत. मनोहर पर्रीकर यांनी शुक्रवारी न्यूयॉर्कमधील स्लोन केटरींग स्मृती फाऊंडेशन इस्पितळात तपासणी करून घेतली आहे.
दिल्लीहून शुक्रवारीच गोव्यात परतलेले भाजपा प्रदेशाध्यक्ष तेंडुलकर यांना पत्रकारांनी मनोहर पर्रीकर यांच्याविषयी विचारले असता, ते म्हणाले की, मनोहर पर्रीकर येत्या 8 सप्टेंबरला गोव्यात परतल्यानंतर लगेच भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीतही भाग घेतील. तसेच, 9 सप्टेंबरला दिल्लीत राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक होईल. मुख्यमंत्रीपदाचा कारभार पुढे नेण्याबाबत मनोहप पर्रीकर हे सक्षम आहेत. ते कार्यक्षमपणे राज्य कारभार हाताळत आहेत व त्यामुळे नेतृत्व बदलाचा प्रश्न येत नाही.
मनोहर पर्रीकर हे गेल्या 10 ऑगस्टला अमेरिकेत गेले होते. त्यानंतर 22 ऑगस्टला गोव्यात परतले होते. यावेळी त्यांना पुन्हा अमेरिकेत उपचारांसाठी जावे लागले. ते फक्त कन्सल्टेशनसाठी गेले आहेत, असा भाजपाचा दावा आहे.
दरम्यान, मनोहर पर्रीकर यांच्या अनुपस्थितीचा गोव्याच्या प्रशासनावर मोठा परिणाम होत असल्याचे काँग्रेसचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांचे म्हणणे आहे. काँग्रेसने याविरुद्ध आंदोलन छेडण्याची गरज आहे. केवळ एका नेत्यासाठी प्रशासन ठप्प करून ठेवता येत नाही. मनोहर पर्रीकर यांनी कामाचा ताबा दुस-या कुठच्याच मंत्र्याकडे दिलेला नाही, असे रेजिनाल्ड म्हणाले. रेजिनाल्ड यांनी काँग्रेस विधिमंडळ पक्षाने सरकारविरोधात निषेधासाठी रस्त्यावर उतरावे अशी हाक शुक्रवारी दिली.