मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची प्रकृती स्थिर; पण अफवांना ऊत
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2019 05:23 PM2019-02-25T17:23:04+5:302019-02-25T17:24:29+5:30
गेल्या शनिवारी रात्री अचानक बांबोळी येथील गोमेकॉ रुग्णालयात उपचारांसाठी दाखल झालेले मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची प्रकृती आता स्थिर आहे.
पणजी : गेल्या शनिवारी रात्री अचानक बांबोळी येथील गोमेकॉ रुग्णालयात उपचारांसाठी दाखल झालेले मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची प्रकृती आता स्थिर आहे. दिल्लीतील एम्स रुग्णालयाचे डॉ. प्रमोद गर्ग यांनी गोव्यात येऊन मुख्यमंत्र्यांच्या आरोग्याची पूर्ण तपासणी केली. पर्रीकर यांची प्रकृती स्थिर झाली तरी, राजकीय अफवांना मात्र ऊत आला आहे.
पर्रीकर यांच्यावर एन्डोस्कॉपी केली जाईल, असे अगोदर जाहीर करण्यात आले होते पण एन्डोस्कॉपी करता आली नाही, असे सुत्रंनी सांगितले. पर्रीकर यांच्या पोटात पूर्वी रक्तस्राव व्हायचा पण उपचाराअंती तो थांबला. पर्रीकर अजुनही बांबोळी येथील गोमेकॉ रुग्णालयातच आहेत. आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी या रुग्णालयाला भेट दिली व डॉक्टरांशी चर्चा केली. पर्रीकर खूप आजारी असल्याने गोव्यात आता तातडीने नेतृत्व बदल होईल, अशा अफवा दिवसभर राज्यभर पसरल्या होत्या. मात्र तसे काहीही नाही, असे भाजप नेत्यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाने ट¦ीटरवरून सोमवारी एक निवेदन केले. एम्सचे डॉ. प्रमोद गर्ग यांच्या नेतृत्वाखाली पर्रीकर यांच्यावर उपचार केले जात आहेत. गर्ग यांनी पर्रीकर यांची पूर्णपणे तपासणी केली. पर्रीकर यांच्या प्रकृतीत झालेल्या सुधारणोविषयी डॉक्टर आनंदित आहेत, असे मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाने म्हटले आहे.
माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्यासह भाजपच्या काही महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी सकाळी गोमेकॉ रुग्णालयाला भेट दिली. पर्रीकर यांना कुणाला भेटू दिले जात नाही. पर्रीकर यांना विश्रंतीची गरज असल्याने त्यांच्या जवळही जास्त कुणाला पाठविले जात नाही. आरोग्य मंत्री राणे यांनी सांगितले की, पर्रीकर यांच्या आरोग्याच्या सद्यस्थितीविषयी काही प्रसार माध्यमे अपप्रचार करत आहेत. चुकीची माहिती पसरविली जात आहे. लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये.