गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकरांचा आजार गंभीरच, अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपस्थित राहणार नाहीत
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2018 06:50 PM2018-02-18T18:50:51+5:302018-02-18T18:53:11+5:30
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे अर्थसंकल्पीय विधानसभा अधिवेशनास उपस्थित राहू शकणार नाहीत, हे आता स्पष्ट झाले आहे. पर्रीकर यांना स्वादुपिंडाचा गंभीर आजार झाल्याचे निष्पन्न झाल्याने विधानसभेचे कामकाजही कमी करण्याच्या हालचाली चालल्या असून त्यासाठी कामकाज सल्लागार समितीची विशेष बैठक उद्या सोमवारी सकाळी बोलावण्यात आली आहे.
पणजी - मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे अर्थसंकल्पीय विधानसभा अधिवेशनास उपस्थित राहू शकणार नाहीत, हे आता स्पष्ट झाले आहे. पर्रीकर यांना स्वादुपिंडाचा गंभीर आजार झाल्याचे निष्पन्न झाल्याने विधानसभेचे कामकाजही कमी करण्याच्या हालचाली चालल्या असून त्यासाठी कामकाज सल्लागार समितीची विशेष बैठक उद्या सोमवारी सकाळी बोलावण्यात आली आहे. अर्थसंकल्प मंजूर करुन घेतल्यानंतर तीन दिवसातच विधानसभा कामकाज संपवायचे असा प्रस्ताव आहे. याबाबतचा निर्णय आज होणार आहे.
पर्रीकर यांच्यावर पुढील वैद्यकीय उपचार करावे लागत असल्याने मुंबईतील लीलावती इस्पितळातून त्यांना रविवारी डिस्चार्ज मिळू शकला नाही. ते अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी उपस्थित राहणार नाहीत, अशी माहिती सूत्रांनी दिली. डॉक्टरांनी पर्रीकर यांना इस्पितळ न सोडण्याचा सल्ला दिलेला आहे. २२ रोजी पर्रीकरांच्या अनुपस्थितीत अर्थसंकल्प कोण मांडणार यावरुन चर्चा सुरु आहे.
उपसभापती मायकल लोबो यांनी विधानसभा कामकाजाचे दिवस कमी करण्याची मागणी सभापतींकडे केली आहे. ‘लोकमत’शी बोलताना लोबो यांनी सांगितले की, केवळ सभापतींकडेच नव्हे तर विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांच्याकडेही मी याबाबतीत बोललेलो आहे.
भाजप आमदारांचीही उद्या बैठक
दरम्यान, भाजप आमदारांची बैठक उद्या सकाळी १0.३0 वाजता बोलावण्यात आली असून या बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या आरोग्याविषयी तसेच विधानसभेच्या कामकामाचे दिवस कमी करण्यासंबंधीची माहिती त्यांना देण्यात येईल. भाजपचे नेते तथा दक्षिण गोव्याचे खासदार यांनी अधिकृतपणे प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात असे म्हटले आहे की, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मुख्यमंत्री पर्रीकर यांना उपचारार्थ आणखी काही काळ मुंबईच्या लीलावती इस्पितळात रहावे लागणार आहे. त्यांच्यावर योग्य दिशेने उपचार चालू आहेत आणि उपचारांना ते प्रतिसादही देत आहेत. या आजारातून उठण्यासाठी त्यांना आणखी काही काळ लागणार आहे. तज्ञ डॉक्टर त्यांच्यावर उपचार करीत असून त्यांना लचकर आराम मिळो, अशी प्रार्थना आम्ही करीत आहोत.
खासदार सावईकर तसेच भाजपचे प्रदेश सरचिटणीस सदानंद शेट तानावडे, संजीव देसाई, दत्ता खोलकर आदी नेत्यांनी आज लीलावती इस्पितळात भेट दिली परंतु उपचार चालू असल्याने त्यांना पर्रीकरांची प्रत्यक्ष भेट मिळू शकली नाही. सध्या त्यांना कोणालाही भेटायला दिले जात नाही.
दरम्यान, विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, सभापतींनी फोनवरुन आपल्याला बैठकीची कल्पना दिली असून आज राज्यपालांच्या अभिभाषणानंतर कामकाज सल्लागार समितीची ही बैठक होणार आहे. कामकाजाबाबत नेमका काय प्रस्ताव आहे हे आज कळेल त्यानंतर पुढील निर्णय घेऊ. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे कामकाजात काही फेरबदल करायचे असतील तर माणुसकीच्या नजरेतून ते आम्ही स्वीकारु. मुख्यमंत्र्यांची प्रकृती लवकर सुधारावी आणि ते पूर्वीप्रमाणे रुजू व्हावेत यासाठी आम्ही प्रार्थना करीत आहोत. कॉग्रेस विधिमंडळाने तशा आशयाचा ठरावही घेतला आहे.