गोव्यात होमगार्ड्सना महिन्यातून २६ दिवस काम, मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 08:39 PM2017-12-18T20:39:29+5:302017-12-18T20:39:41+5:30
होमगार्ड्सना महिन्यातून २६ दिवस काम दिले जाणार असल्याचे निवेदन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी विधानसभेत दिले. आठवड्यातून दोनवेळा सुट्टी संबंधी अद्याप त्यांना लेखी आदेश देण्यात आला नसल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
पणजी: होमगार्ड्सना महिन्यातून २६ दिवस काम दिले जाणार असल्याचे निवेदन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी विधानसभेत दिले. आठवड्यातून दोनवेळा सुट्टी संबंधी अद्याप त्यांना लेखी आदेश देण्यात आला नसल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
होमगार्डना आठवड्यातून दोन दिवस सुट्टी घेण्याचे पोलीस खात्याचे तोंडी फर्मान विधानसभेतही गाजले. विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर आणि भाजपचे सदस्य राजेश पाटणेकर यांनी हा विषय लक्ष्यवेधी सूचना करून सभागृहात मांडला. दोन दिवस सुट्टी दिल्यामुळे दोन दिवसांचा त्यांचा पगार कापला जाणार आहे. होमगार्डना सुट्टीच्या दिवशी पगार मिळत नाही. त्यामुळे या पोलीस खात्याच्या आदेशामुळे होमगार्डांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे असे कवळेकर यांनी सांगितले.
त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी तो निर्णय काही तांत्रीक मुद्यांमुळे घेण्यात आला होता. सुट्टीच्या दिवशीही काही होमगार्ड हजेरी लावतात असे आढळून आल्याचे ते म्हणाले. परंतु असे असले तरी दोन दिवस सुट्टीचा आदेश जारी करण्यात आलेला नसल्याचे त्यांनी सांगितले. आठवड्याला एक दिवसच त्यांना सक्तीची सुट्टी असेल. महिन्यातून एकूण २६ दिवस ते काम करतील असे आश्वासन त्यांनी दिले.
होमगार्डना निवृत्ती वेतन नसल्यामुळे अंगणवाडीशिक्षिकांसारखे त्यांना एकरकमी अर्थसहाय्य देण्याची तसेच विविध भत्त्यांचाही लाभ देण्याची मागणी पाटणेकर केली. यावर मुख्यमंत्र्यांनी भाजप सरकारनेच होमगार्डना आतापर्यंत दिलासा दिल्याचे सांगितले. त्यांचे वेतन वाढविण्यापासून त्यांच्यासाठी पोलीस खात्यात १० टक्के कोठा ठेवण्याचे कामही आपल्याच सरकारने केल्याचे त्यांनी सांगितले. त्यांना त्यासाठी ५० वर्षे वयाच्या मर्यादेची अट आहे. तसेच त्यांना लेखी परीक्षेसाठी प्रशिक्षण देण्याचीही व्यवस्था केली जाईल असे मुख्यमंत्री म्हणाले. अतिरिक्त होमगार्ड भरती करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.