मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरांचा मिरामारला फेरफटका
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2019 07:05 PM2019-03-04T19:05:30+5:302019-03-04T19:05:52+5:30
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. सोमवारी दुपारी त्यांनी बरे वाटू लागल्याने मिरामार येथे गाडीत बसूनच फेरफटका मारला.
पणजी : मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. सोमवारी दुपारी त्यांनी बरे वाटू लागल्याने मिरामार येथे गाडीत बसूनच फेरफटका मारला.
मनोहर पर्रीकर यांची कृषी मंत्री तथा गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी अगोदर भेट घेतली. करंजाळे- दोनापावल येथील खासगी निवासस्थानी मनोहर पर्रीकर होते. रविवारीच मनोहर पर्रीकर यांनी बांबोळीच्या गोमेकॉ इस्पितळात तपासणी करून घेतली होती. त्यांचे स्कॅनिंगही करून ते अहवाल दिल्लीच्या एम्स संस्थेला पाठविण्यात आल्याचे कळते. विजय सरदेसाई यांनी मनोहर पर्रीकर यांच्याशी राजकीय विषयांबाबत चर्चा केली. काही विकास कामांविषयीही चर्चा झाली.
आपण दक्षिण गोव्यात जुवारी पुलाचे काम कसे चाललेय ते लवकरच पाहून येईन, असे मुख्यमंत्र्यांनी सरदेसाई यांना सांगितले. विजय सरदेसाई यांनी मनोहर पर्रीकर यांची भेट घेऊन आल्यानंतर पत्रकारांना हीच गोष्ट सांगितली. मनोहर पर्रीकर यांची प्रकृती आपल्याला आज खूप चांगली दिसली. ते खूपवेळ आपल्याशी बोलले. ते जुवारी पुलाच्या कामाची पाहणी करण्यासाठी आता लवकरच निघतील असे विजय सरदेसाई यांनी जाहीर केले. यामुळे पत्रकारही जुवारी पुलाकडे जाऊन थांबले. मात्र मनोहर पर्रीकर प्रत्यक्षात दुपारी अडीचच्या सुमारास घरातून वाहनाने बाहेर आले व थेट मिरामारला त्यांचे वाहन गेले. तिथे एक फेरफटका मारून ते माघारी वळले.
मनोहर पर्रीकर यांच्या सेवेसाठी गोमेकॉचे डॉ. कोलवाळकर कायम असतात. मनोहर पर्रीकर यांचा चेहरा नेहमीपेक्षा आता वेगळा दिसतो. म्हणजेच त्यात ब-यापैकी सुधारणा दिसते. एम्सच्या दोघा डॉक्टरांनी गेल्याच आठवडय़ात मनोहर पर्रीकर यांना गोमेकॉत तपासले होते. मनोहर पर्रीकर यांच्या आरोग्यात सुधारणा झाली असल्याचा निष्कर्ष त्यांनी काढला होता. त्यांनी दिलेली औषधे मनोहर पर्रीकर यांच्यासाठी योग्य ठरू लागली आहेत, असे सुत्रांनी सांगितले.