गोव्यात मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी 28 मार्चला; PM मोदी, शाहंसह 7 राज्यांचे CM राहणार उपस्थित
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2022 09:42 PM2022-03-22T21:42:32+5:302022-03-22T21:43:33+5:30
सावंत यांची सोमवारी भाजप विधिमंडळ नेतेपदी निवड जाहीर झाली. त्यानंतर भाजपने राज्यपालांकडे सरकार स्थापनेचा दावा केल्यानंतर राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी भाजपला सरकार स्थापनेसाठी निमंत्रणही दिले.
पणजी - गोव्यात नव्या सरकारचा शपथविधी सोहळा येत्या सोमवारी म्हणजेच २८ मार्चला होणार असल्याचे निश्चित झाले आहे. दोनापॉल येथे डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर सकाळी ११ वाजता होणार असलेल्या या सोहळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय भूपृष्ट वाहतूकमंत्री नीतीन गडकरी व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा तसेच भाजपची सत्ता असलेल्या सात राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. स्वतः मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ही माहिती दिली. पंतप्रधान कार्यालयातून मोदीजींच्या उपस्थितीवर शिक्कामोर्तब झाले असून दोनापॉल येथे स्टेडियमजवळ हेलिपॅड बांधण्याची तयारीही सुरु झाली आहे.
सावंत यांची सोमवारी भाजप विधिमंडळ नेतेपदी निवड जाहीर झाली. त्यानंतर भाजपने राज्यपालांकडे सरकार स्थापनेचा दावा केल्यानंतर राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी भाजपला सरकार स्थापनेसाठी निमंत्रणही दिले. यापूर्वी शपथविधीसाठी २३ तारीख ठरली होती. परंतु उद्या उत्तराखंडमध्ये सरकारचा शपथविधी असल्याने व पंतप्रधान मोदीजी तसेच अमित शाह तेथे उपस्थित राहणार असल्याने तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवरील २० पदाधिकारीही शपथविधीसाठी येतील. शपथविधी सोहळ्यात मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी व्हावेत आणि जनतेच्या साक्षीने हा सोहळा व्हावा यासाठी श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियम निवडले आहे. हा सोहळा दिमाखदार होणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी सांगितले.
दरम्यान, भाजपकडे स्वत:च्या २० आमदारांसह मगोपचे २ व अपक्ष ३, असे एकूण २५ आमदारांचे संख्याबळ आहे. मगोप व अपक्षांनी सोमवारी पाठिंब्याची पत्रेही राज्यपालांना सादर केली आहेत. मुख्यमंत्र्यांसह सर्व १२ मंत्र्यांचा शपथविधी सोमवारी होण्याची शक्यता आहे.