गोव्याचे मुख्यमंत्री करणार अवयवदान, शपथ घेतली; मरणोत्तर मूत्रपिंड, यकृत व कोर्निया करणार दान

By किशोर कुबल | Published: September 28, 2023 03:55 PM2023-09-28T15:55:02+5:302023-09-28T15:56:22+5:30

संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करून त्यांनी अवयवदानाचे प्रमाणपत्रही मिळवले.

Chief Minister of Goa to donate organs, took oath; Kidney, liver and cornea will be donated post-mortem | गोव्याचे मुख्यमंत्री करणार अवयवदान, शपथ घेतली; मरणोत्तर मूत्रपिंड, यकृत व कोर्निया करणार दान

गोव्याचे मुख्यमंत्री करणार अवयवदान, शपथ घेतली; मरणोत्तर मूत्रपिंड, यकृत व कोर्निया करणार दान

googlenewsNext

किशोर कुबल/पणजी

पणजी : मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी अवयवदानाची शपथ घेतली असून मरणोत्तर ते आपले मूत्रपिंड, यकृत व डोळ्यातील बुब्बळ ( कोर्निया) दान करणार आहेत. संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करून त्यांनी अवयवदानाचे प्रमाणपत्रही मिळवले.

पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, 'सरकार लवकरच मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया दीनदयाळ स्वास्थ्य सेवा योजना (डी डी एस वाय) कार्डाच्या कक्षेत आणणार आहे. गोमेकॉत पूर्ववत नेत्रपेढी सुरू केली जाईल तसेच हृदय आणि यकृत रोपणाच्या शस्त्रक्रियेची सोयही केली जाईल.'

राज्यात ४६ रुग्ण मूत्रपिंडाच्या प्रतीक्षेत आहेत, अशी माहिती देताना मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, प्रत्येकाने अवयवदान केल्यास इतरांना जीवदान मिळू शकेल. 

भाजप तर्फे सेवा पंधरवड्याच्या निमित्ताने देशभर अवयव दानाबद्दलही जागृती केली जात आहे. प्रदेश भाजपच्या वैद्यकीय विभागाने आज हा अवयवदान नोंदणीचा कार्यक्रम घडवून आणला. याप्रसंगी पक्षाच्या वैद्यकीय विभागाचे अध्यक्ष डॉ. शेखर साळकर सहप्रमुख श्रीमती स्नेहा भागवत व पक्षाचे प्रदेश सरचिटणीस दामोदर नाईक उपस्थित होते.

 मुख्यमंत्री म्हणाले की, 'मी अवयदानाची शपथ घेऊन प्रमाणपत्रही मिळवले आहे. आतापर्यंत गोमेकॉत अवयव दानाची चार प्रकरणे यशस्वी झालेली आहेत. सर्वांनी आपणहून पुढे येऊन अवयवदान करायला हवे. त्यासाठी फक्त अठरा वर्षे वयाच्या वर व्यक्ती हवी. आमदार तसेच इतर लोकप्रतिनिधींनी मतदारसंघांमध्ये तसेच प्रत्येक तालुक्यात अवयवदानाविषयी जागृती घडवून आणावी.'

 मुख्यमंत्री म्हणाले की, 'मूत्रपिंडाचे आजार एवढे वाढले आहेत की, गोव्यात दिवसाला एक तरी नवीन व्यक्ती डायलिसिससाठी पाठवावी लागते.'

डॉ. शेखर साळकर म्हणाले की, ब्रेन डेड व्यक्तीही पाच जणांना वेगवेगळ्या अवयव दानाने जीवदान देऊ शकते. संकेतस्थळावर नोंदणी करून प्रमाणपत्र घेतले तरी संबंधित व्यक्ती मृत्यू पावल्यानंतर त्याची पत्नी किंवा जवळच्या नातेवाईकांनीही संबंधिताच्या अवयव दानासाठी परवानगी द्यावी लागते व त्यानंतरच हे सोपस्कार पूर्ण होतात.

Web Title: Chief Minister of Goa to donate organs, took oath; Kidney, liver and cornea will be donated post-mortem

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.