मुख्यमंत्री पर्रीकर यांनी अमेरिकेतून साधला गोव्याच्या मंत्र्यांशी संवाद
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2018 06:56 PM2018-04-17T18:56:35+5:302018-04-17T18:56:35+5:30
अमेरिकेला दीड महिन्यांपूर्वी उपचारांसाठी गेलेले मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी मंगळवारी आपल्या मंत्रिमंडळातील दोघा मंत्र्यांना सुखद धक्का दिला. मुख्यमंत्री पर्रीकर यांनी दोघा मंत्र्यांशी संवाद साधला व आपण ठीक असल्याचे सांगितले.
पणजी - अमेरिकेला दीड महिन्यांपूर्वी उपचारांसाठी गेलेले मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी मंगळवारी आपल्या मंत्रिमंडळातील दोघा मंत्र्यांना सुखद धक्का दिला. मुख्यमंत्री पर्रीकर यांनी दोघा मंत्र्यांशी संवाद साधला व आपण ठीक असल्याचे सांगितले. आपली प्रकृती बरीच सुधारल्याचे त्यांनी नगर नियोजन खात्याचे मंत्री तथा गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांना व आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनाही सांगितले.
पर्रीकर यांचा मंत्र्यांशी अलिकडे संवाद नव्हता. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातील विशेष सचिव कृष्णमूर्ती यांचाच पर्रीकर यांच्याशी फोनवरून संवाद होत असे. मंगळवारी सायंकाळी साडेचार वाजता पर्वरी येथील मंत्रलयात तीन मंत्र्यांच्या सल्लागार समितीची बैठक ठरली होती. मंत्री सुदिन ढवळीकर व फ्रान्सिस डिसोझा हे या बैठकीला वेळेत पोहचले. तथापि, एका वाहन अपघातामुळे मांडवी पुलाकडे झालेल्या वाहतूक कोंडीमुळे मंत्री सरदेसाई हे बैठकीला पाच वाजता पोहचले. सरदेसाई बैठकीला येत असतानाच पावणे पाचच्या सुमारास पर्रीकर यांचा सरदेसाई यांना फोन आला. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातील विशेष सेवा अधिकारी रुपेश कामत हे अमेरिकेला गेले आहेत. कामत यांच्या फोनवरून पर्रीकर यांचा प्रथम मंत्री सरदेसाई यांना फोन आला.
सरदेसाई यांनी पत्रकारांना सांगितले, की ''पर्रीकर यांचा आपल्याशी अलिकडे संवाद नव्हता. आपणही त्यांच्या उपचार प्रक्रियेत व्यत्यय नको म्हणून फोन करत नव्हतो. तथापि, आश्चर्यकारकरित्या कामत यांच्या मोबाईल फोनवरून आपल्याला मंगळवारी सायंकाळी पर्रीकर यांचा फोन आला. आपल्याशी पर्रीकर बराचवेळ बोलले. मंत्रिमंडळ सल्लागार समिती खनिजखाणप्रश्नी चर्चा करणार असल्याचे आपण त्याना सांगितले. आपण त्याना आपल्या सावर्डे मतदारसंघातील भेटीबाबतही माहिती दिली. पर्रीकर यांनी आपल्यावर तिस-या टप्प्यातील उपचार सोमवारी सुरू होणार असल्याचे आपल्याला सांगितले. पर्रीकर यांचा आवाज हा पूर्वीच्या तुलनेत आता पूर्णपणे आपल्याला बरा वाटला. तीन आठवडय़ांनंतर ते गोव्यात येतील.''
आरोग्यमंत्री विश्वजित राणे हेही म्हणाले, की ''आपल्यालाही मंगळवारीच सायंकाळी पर्रीकर यांचा फोन आला. पर्रीकर यांची प्रकृती सुधारली आहे. पर्रीकर यांनी आपल्याशी ब-यापैकी चर्चा केली.''