वेळगेत मुख्यमंत्र्यांची 'टिफिन पे चर्चा'; सातेरी मंदिरात कार्यकर्त्यांशी साधला संवाद
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2023 12:13 PM2023-06-05T12:13:50+5:302023-06-05T12:14:20+5:30
परस्पर संवाद वाढविण्यावर देणार भर
लोकमत न्यूज नेटवर्क डिचोली: भारतीय जनता पक्ष हा एक परिवार आहे. एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होताना प्रत्येकाचे प्रश्न समजून घेत त्यावर तोडगा काढावा. परिवारात सुख- समृद्धी नांदावी असा उद्देश आहे. त्याच हेतूने भाजपच्या राष्ट्रीय धोरणाचा एक भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून 'टिफिन पे चर्चा' उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे' असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले.
वेळगे येथील सातेरी मंदिरात प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत या बैठकीचे आयोजन केले होते. भाजप मंडल अध्यक्ष गोपाळ सुर्लकर, सरचिटणीस कालिदास गावस, नगराध्यक्ष रश्मी देसाई,उपनगराध्यक्ष आनंद काणेकर, नगरसेवक, सातही पंचायतींचे सरपंच, उपसरपंच, पंच सदस्य, भाजपच्या सर्व मोर्चाचे प्रतिनिधी, बूथ समिती प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
टिफिन बैठकीत मुख्यमंत्री सावंत यांनी स्वतः अल्पोपहार आणला होता. कार्यकर्त्यांनी एकाच पंगतीत बसून टिफिनचे आदान प्रदान केले. एकत्र बसून आस्वाद घेतला. मुख्यमंत्री सावंत यांनी उपस्थित कार्यकर्त्यांशी सुमारे दोन तास चर्चा केली. लोकांचे प्रश्न समजून घेतले. त्यांच्या समस्याही सोडवण्याचे आश्वासन दिले. लोकांच्या सूचना समजून घेतल्या. लवकरच समस्या सोडविल्या जातील असे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.
संतोष मळीक यांनी कार्यक्रमाचा हेतू विशद केला. विविध ठिकाणी दर तीन महिन्यांनी टिफिन बैठक आयोजित करून भाजप परिवार अधिक मजबूत करण्यासाठी कार्य केले जाईल असे गोपाळ सुर्लकर यांनी सांगितले. समंता कामत यांनी आभार मानले.
विश्वासाची भावना निर्माण करा
भाजप परिवार खूप मोठा आहे. लोकांना, कार्यकर्त्यांची भेट निवडणुकीपुरतीच मर्यादित न राहता सतत लोकांच्या संपर्काति राहणे, त्यांचे प्रश्न, विचार समजून घेत त्यांना मार्गदर्शन करणे, एकोप्याची, विश्वासाची भावना वृद्धिगत करणे हा या टिफिन बैठकीचा मूळ उद्देश पंतप्रधान मोदींनी सांगितला आहे, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले.