आदर्शवत... मुख्यमंत्री करणार मूत्रपिंड, यकृत व बुबूळ दान!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2023 05:40 AM2023-09-29T05:40:34+5:302023-09-29T05:56:50+5:30

ऑनलाईन नोंदणी करून मिळवले प्रमाणपत्र

Chief Minister pramod sawant will donate kidney, liver and iris! | आदर्शवत... मुख्यमंत्री करणार मूत्रपिंड, यकृत व बुबूळ दान!

आदर्शवत... मुख्यमंत्री करणार मूत्रपिंड, यकृत व बुबूळ दान!

googlenewsNext

लाेकमत न्यूज नेटवर्क
पणजी : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अवयवदानाची शपथ घेतली असून मरणोत्तर ते आपले मूत्रपिंड, यकृत व डोळ्यातील बुबूळ ( कोर्निया) दान करणार आहेत. गुरुवारी त्यांनी संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करून अवयवदानाचे प्रमाणपत्रही मिळवले.

पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी अवयवदान करत असल्याची माहिती दिली. प्रदेश भाजपच्या वैद्यकीय विभागाने काल हा अवयवदान नोंदणीचा कार्यक्रम घडवून आणला. याप्रसंगी मुख्यमंत्र्यांसोबत पक्षाच्या वैद्यकीय विभागाचे अध्यक्ष डॉ. शेखर साळकर, सहप्रमुख स्नेहा भागवत व पक्षाचे प्रदेश सरचिटणीस दामोदर नाईक उपस्थित होते. भाजपतर्फे सेवा पंधरवड्यानिमित्ताने देशभर अवयव दानाबद्दलही जागृती केली जात आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, ‘मी अवयदानाची शपथ घेऊन प्रमाणपत्रही मिळवले आहे. आतापर्यंत गोमेकॉत अवयव दानाची चार प्रकरणे यशस्वी झालेली आहेत. सर्वांनी आपणहून पुढे येऊन अवयवदान करायला हवे. त्यासाठी फक्त अठरा वर्षे वयाच्या वर व्यक्ती हवी. आमदार तसेच इतर लोकप्रतिनिधींनी मतदारसंघांमध्ये तसेच प्रत्येक तालुक्यात अवयवदानाविषयी जागृती घडवून आणावी.

     मूत्रपिंडाचे आजार एवढे वाढले आहेत की, गोव्यात दिवसाला एक तरी नवीन व्यक्ती डायलिसीससाठी पाठवावी लागते. डॉ. शेखर साळकर म्हणाले की, ब्रेन डेड व्यक्तीही पाच जणांना वेगवेगळ्या अवयव दानाने जीवदान देऊ शकते. संकेतस्थळावर नोंदणी करून प्रमाणपत्र घेतले तरी संबंधित व्यक्ती मृत्यू पावल्यानंतर त्याची पत्नी किंवा जवळच्या नातेवाईकांनीही संबंधिताच्या अवयव दानासाठी परवानगी द्यावी लागते व त्यानंतरच हे सोपस्कार पूर्ण होतात, असे डॉ. शेखर साळकर यांनी सांगितले.

मूत्रपिंड प्रत्यारोपण ‘दीनदयाळ’मध्ये आणणार

मुख्यमंत्री म्हणाले की, सरकार लवकरच मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया दीनदयाळ स्वास्थ्य सेवा योजना (डीडीएसवाय) कार्डाच्या कक्षेत आणणार आहे.

गोमेकॉत पूर्ववत नेत्रपेढी सुरू केली जाईल. तसेच हृदय आणि यकृत रोपणाच्या शस्त्रक्रियेची सोयही केली जाईल. राज्यात ४६ रुग्ण मूत्रपिंडाच्या प्रतीक्षेत आहेत त्यामुळे प्रत्येकाने अवयवदान केल्यास इतरांना जीवदान मिळू शकेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

अवयवदान घोषणेनंतर... 
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी एक अत्यंत चांगला निर्णय घेताना अवयवदानाची घोषणा केली आहे. राज्याचे मुख्यमंत्रीच जेव्हा जुने समज गैरसमज वगैरे दूर सारून  अशा भल्या कामांसाठी पुढे सरसावतात तेव्हा त्यांचे अनुकरण करण्यास इतर लोकही पुढे येतात. निदान भाजपचे कार्यकर्ते तरी निश्चितच पुढे येतील याबद्दल शंका नसावी. परंतु हे करतानाच एक महत्त्वाची जबाबदारीही मुख्यमंत्र्यांनी आपल्या कार्यकर्त्यांवर सोपविली आहे.   अवयव दान करणे ही गोष्ट वाटते तितकी सोपी नाही. कारण माणसाच्या मृत्युपर्यंत  त्याचे अवयव चांगले निरोगी असणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री स्वत: एक डॉक्टर असल्यामुळे त्यांना याविषयी पुरेपूर माहिती आहे. परंतु आता कार्यकर्त्यांवर जबाबदारीने वागण्याची वेळ आली आहे.  त्यासाठी चांगल्या संवयी लावणे, व्यसनांपासून दूर राहणे  या गोष्टी पाळाव्या लागतील. त्यामुळे त्यांना सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो इतकेच आपण म्हणू.

Web Title: Chief Minister pramod sawant will donate kidney, liver and iris!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.