"मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वास्कोत आमंत्रित करावे"
By पंकज शेट्ये | Published: February 8, 2024 07:42 PM2024-02-08T19:42:19+5:302024-02-08T19:42:54+5:30
माजीमंत्री जुझे फीलीप डीसोझा यांची मागणी
वास्को: गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वास्कोत येण्यासाठी आमंत्रित करावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जर वास्कोत येणार असल्यास अनेक वर्षापासून अडकून राहीलेला वास्कोचा विकास एका महीन्यात नक्कीच पूर्ण होणार. मी जेव्हा मंत्री आणि आमदार होतो त्यावेळी कुठले काम होण्यास उशिर झाल्यास विरोधक त्वरित आवाज उठवायचे. वास्कोत आता विकासकामे रखडलेली असून आज विरोधक गप्प का झाले आहेत असा सवाल वास्कोचे माजी आमदार आणि राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष (शरद पवार गट) जुझे फीलीप डीसोझा यांनी उपस्थित केला.
जुझे फीलीप डीसोझा यांनी गुरूवारी (दि.८) घेतलेल्या पत्रकार परिषदेत वास्को मतदारसंघातील अनेक विकासकामे रखडलेली असल्याचा आरोप केला. जेव्हा मी वास्कोचा आमदार होतो त्यावेळी कदंब बसस्थानकाजवळ मी प्रशासकीय इमारत उभारण्याचा प्रकल्प आणून त्याची पायाभरणी केली होती. मात्र माझ्यानंतर त्या प्रकल्पाचे काम बंद पाडल्याने अजूनही तो प्रकल्प झाला नाही. तसेच मी आणलेला बसस्थानक प्रकल्प, सिग्निचर प्रकल्प अजून अस्थित्वात आले नसून त्यामागचे कारण काय असा सवाल डीसोझा यांनी उपस्थित केला. कोट्यावधी रुपये खर्च करून लोकांची पाण्याची समस्या दूर करण्यासाठी मी वास्कोत रिझर्व्हर टाकी प्रकल्प उभारला होता. त्यात पाणी भरून ठेवल्यास पाच दिवस वास्कोतील लोकांना पाणी टंचाईची समस्या निर्माण होणार नाही. मात्र त्या प्रकल्पाचा योग्य वापर केला जात नसून त्यामागचे कारण काय असा सवाल त्यांनी उपस्थित केला. जेव्हा मी वास्कोचा आमदार होतो तेव्हा कुठल्याही कामाला थोडापण उशिर झाल्यास विरोधक त्वरित आवाज उठवायचे. मात्र आज वास्कोतील अनेक विकासकामे रखडलेली असून दुसऱ्या पक्षाचे विरोधक गप्प का झाले आहेत असा सवाल त्यांनी केला. विरोधक गप्प झाल्यानेच वास्कोतील विकासकामे रखडलेली असल्याचे डीसोझा म्हणाले.
काही दिवसापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी मडगावात जाहीर सभेच्या निमित्ताने आले होते. ते येत असल्याने काही दिवसातच मडगावचा उत्तमरित्या विकास करण्यात आला. अनेक वर्षापासून दुर्लक्षित केल्याने दुदर्क्षा झालेल्या मडगाव बस स्थानकाचा पंतप्रधान येत असल्याने चांगल्या प्रकारे विकास करण्यात आला. मी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना मागणी करतो की त्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वास्को मतदारसंघात आमंत्रीत करावे. पंतप्रधान येत असल्यास रस्त्यांचे डांबरीकरण इत्यादी अनेक विकासकामे पूर्ण होतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी वास्कोत येत असल्याचे कळाल्यास एका महीन्यात वास्को बरोबरच येथील अन्य दोन मतदारसंघांचा उत्तम विकास होणार असून त्याच निमित्ताने वास्कोतील रखडलेली विकासकामे पूर्ण होणार असे डीसोझा म्हणाले.