जीवरक्षकांच्या संपावर मुख्यमंत्र्यांनी तोडगा काढावा - दिगंबर कामत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2019 10:18 PM2019-11-17T22:18:04+5:302019-11-17T22:18:52+5:30
काल हरमल किना-यावर एका विदेशी पर्यटकाला जीव गमवावा लागला.
पणजी: जीवरक्षकांच्या संपामुळे मागील काही दिवसांत गोव्यात सुमारे १४ पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला असून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ताबडतोब यात हस्तक्षेप करुन जीवरक्षकांच्या संपावर तोडगा काढावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी केली आहे.
काल हरमल किना-यावर एका विदेशी पर्यटकाला जीव गमवावा लागला. सरकारने या प्रश्नावर संवेदनशीलता दाखवणे महत्वाचे असून, जीवरक्षकाना सरकारी सेवेत सामावून घेऊन त्यांच्या मागण्या मान्य करणे गरजेचे आहे, असे दिगंबर कामत यांनी सांगितले. सरकारने त्वरीत यात हस्तक्षेप न केल्यास संपूर्ण पर्यटन व्यवसायच बुडण्याची शक्यता असून त्यामुळे गोवा हे जलसमाधी स्थळ म्हणून राज्याची बदनामी होईल, हे मुख्यमंत्र्यानी लक्षात ठेवावे, असेही त्यांनी म्हटले आहे.
आपला जीव धोक्यात घालून, दुस-यांचे जीव वाचविण्याची सेवा बजावणा-या गोमंतकीय जीवरक्षकांना सर्व मदत व सहकार्य देणे सरकारचे कर्तव्य असून, त्यांच्यावर अन्याय होणार नाही याची खबरदारी घेण्याची जबाबदारी सरकारची असल्याचे दिगंबर कामत म्हणाले.
याचबरोबर, गोव्यातील पर्यटन व्यवसाय सध्या कठिण परिस्थितीतून जात असून, रद्द झालेली चार्टर विमाने, शॅक वाटपात झालेला विलंब तसेच देशात आलेले आर्थिक मंदीचे सावट यामुळे पर्यटन उद्योगावर परिणाम झाला आहे. सरकारला पर्यटन उद्योगाला उभारी देण्यासाठी त्वरीत उपाय काढणे गरजेचे आहे. मुख्यमंत्र्यानी त्वरित संबंधीत अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सर्व गोमंतकीय जीवरक्षकाना सरकारी सेवेत घेण्यासाठी पावले उचलावीत, असेही आवाहन दिगंबर कामत यांनी केले आहे.