टुगेदर फॉर साखळीचा धुव्वा; मुख्यमंत्र्यांची रणनीती यशस्वी, विरोधकांचे सर्व प्रयत्न वाया
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2023 03:14 PM2023-05-08T15:14:43+5:302023-05-08T15:16:28+5:30
विरोधकांचे सर्व प्रयत्न वाया गेले.
लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोलीः साखळी पालिका निवडणुकीत भाजपने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करताना बारापैकी अकरा जागा जिंकून आपला करिष्मा सिद्ध केला. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आखलेले राजकीय डावपेच, त्यांना उमेदवार व कार्यकत्यांची मिळालेली साथ यामुळे भाजपने दणदणीत यश संपादन केले. विरोधकांचे सर्व प्रयत्न वाया गेले.
यापूर्वी प्रभाग आठमधून भाजपचे रियाज खान हे बिनविरोध निवडून आले होते. त्यामुळे पक्षाचे एकूण अकरा नगरसेवक विजयी झाले असून विरोधकांचा धुव्वा उडाला आहे. टूगेदर फॉर साखळीचे प्रभाग पाचमधून प्रवीण ब्लेगन हे एकमेव उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. भाजपचे मागील अनेक वर्षांचे साखळी पालिकेतील सत्तेचे स्वप्न साकारले आहे.
गुलाल उधळून आनंदोत्सव
निकाल जाहीर झाल्यावर उमेदवारांच्या समर्थकांनी विजयी मिरवणूक काढून, गुलाल उधळून विजयाचा आनंद साजरा केला. विजयी उमेदवारांचे भाजपच्या महिला नेत्या सुलक्षणा सावंत, मंडळ अध्यक्ष गोपाळ सुलकर, मुख्यमंत्री सावंत यांचे वडील पांडुरंग सावंत यांच्यासह उपस्थित कार्यकर्त्यांनी विशेष अभिनंदन केले.
उमेदवारांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार
सिद्धी पोरोब यांनी मुख्यमंत्री तसेच सुलक्षणा सावंत यांच्यासह कार्यकर्ते, मतदारांनी जो सुरुवातीपासून विश्वास दाखवला त्याचे सार्थक झाले असे सांगितले. शहराच्या विकासासाठी प्रामाणिक सेवा बजावणार असल्याचे त्या म्हणाल्या. आनंद काणेकर, यशवंत माडकर, प्रभाग बारामधील विजयी उमेदवार अंजना कामत, दीपा जल्मी, ब्रम्हा देसाई, निकिता नाईक यांनी विजयाचे श्रेय कार्यकर्ते, मतदार व मुख्यमंत्र्यांना दिले.
बोर्येकरांची हॅटट्रिक
दयानंद बोर्येकर यापूर्वी दोन वेळा विजय संपादन केला होता. आताच्या विजयाने त्यांनी हॅटट्रिक केली. पूर्ण बहुमत असल्याने साखळीच्या विकासाला चालना मिळेल असे त्यांनी सांगितले.
पराभव मान्य: सागलानी
ट्रगेदर फॉर साखळीचे धर्मेश सागलानी यांनी जनतेने दिलेला कौल मान्य असल्याचे सांगितले, ते म्हणाले, 'केलेले काम घेवून जनतेपर्यंत पोहोचणे शक्य झाले नाही. इतरही काही बाबीमुळे आम्ही योग्य नियोजन करू शकलो नाही. आम्ही जनतेच्या मतांचा आदर करतो.
आईच्या विजयामुळे मुलगा खुश
प्रभाग सहामधून सत्तर वर्षीय विनंती विनायक पार्सेकर यांना भाजपने उमेदवारी दिली. माजी नगराध्यक्ष राया पार्सेकर यांना मुख्यमंत्र्यांनी भाजपमध्ये प्रवेश देऊन त्यांच्या आईंना महिला राखीव प्रभागातून उमेदवारी दिली. त्यांनी डॉ. सरोज देसाई यांचा २१० मतांनी पराभव केला. आई विक्रमी २१० मताधिक्याने विजयी झाली याचा खूप अभिमान वाटतो असे राया पार्सेकर यांनी सांगितले. भाजप अधिक जोमाने मोठी आघाडी घेणार. लोकसभेतही मोठी मुसंडी मारेल असा विश्वास पार्सेकर यांनी व्यक्त केला. विनंती यांनी मुख्यमंत्र्यांसह मतदार, कार्यकत्यांचा हा विजय असल्याच्या भावना व्यक्त केल्या.
भाजपचे निर्विवाद वर्चस्व: सुलक्षणा सावंत
पालिका निवडणुकीत सर्व कार्यकर्ते मतदार यांनी भाजपला मोठे सहकार्य केले. मुख्यमंत्र्यांचा दूरदृष्टीपणा, विकासाच्या योजना, त्यांची रणनीती यातून हे अभूतपूर्व यश लाभले असे भाजप नेत्या सुलक्षणा सावंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. आम्ही योग्य पद्धतीने प्रचार केला. सर्वांची साथ मिळाली असे त्या म्हणाल्या. मंडळ अध्यक्ष गोपाळ सुलकर यांनी आम्हाला हा विजय अपेक्षित होता असे सांगितले.
नगराध्यक्षपदासाठी नावांची चर्चा
पालिकेवर निर्विवाद वर्चस्व मिळवल्याने आता नगराध्यक्ष पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याबाबत उत्सुकता आहे. जेष्ठ नगरसेविका रश्मी देसाई यांचे नाव या पदासाठी चर्चेत आहे. तर उपनगराध्यक्ष पदावर कोण विराजमान होणार या बाबतही उत्सुकता आहे.