मुख्यमंत्री सोमवारी घरीच मंत्रिमंडळाची बैठक घेणार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2019 06:34 PM2019-02-16T18:34:16+5:302019-02-16T18:34:27+5:30
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे येत्या सोमवारी करंजाळे- दोनापावल येथील आपल्या घरीच मंत्रिमंडळाची बैठक घेणार आहेत.
पणजी : मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे येत्या सोमवारी करंजाळे- दोनापावल येथील आपल्या घरीच मंत्रिमंडळाची बैठक घेणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी दोनवेळा सचिवालयात मंत्रिमंडळाच्या बैठका घेतल्या, पण आता त्यांनी सचिवालयात येणो पुन्हा थांबविले आहे. त्यामुळे ते घरीच सर्व मंत्र्यांना भेटतील.
पर्रीकर हे दिल्लीतील एम्समधून उपचार घेऊन परतल्यानंतर पुन्हा मंत्रालय तथा सचिवालयात गेले नाहीत. विधानसभा अधिवेशन संपल्यानंतर पुन्हा त्यांनी सचिवालयाला भेट देण्याचा योग आला नाही. पर्रीकर सध्या घरीच असतात. ते घराकडूनच काम करतात. पर्रीकर यांनी सोमवारी सायंकाळी साडेचार वाजता मंत्रिमंडळाची बैठक बोलावली तरी, बैठकीसमोर कोणती कार्यक्रम पत्रिका असेल याची कल्पना अजून कुठच्याच मंत्र्याला आलेली नाही. सोमवारी सकाळीच आम्हाला अजेंडा मिळेल, असे काही मंत्र्यांनी लोकमतला सांगितले.
दरम्यान, अधिवेशन पार पडल्यानंतरची ही पहिली बैठक आहे. नोकर भरतीची प्रक्रिया सरकारने आताच सुरू केली असून अजुनही काही अडचणी भरतीवेळी येत आहेत काय हे मुख्यमंत्री मंत्र्यांकडून जाणून घेतील असे कळते. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता 2 मार्चनंतर कधीही लागू शकते. एकदा आचारसंहिता लागू होताच नोकर भरती स्थगित होईल. राज्यातील खनिज खाण बंदीविषयी उपाय निघेल असे सर्व मंत्र्यांना यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते. अजून तोडगा निघाला नाही, तोडगा निघण्याची शक्यताही अनेक मंत्री, आमदारांना दिसत नाही. मंत्रिमंडळ बैठकीत काही मंत्री याविषयी बोलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वीजमंत्री निलेश काब्राल हे सध्या जाहीरपणो अनेक विधाने करत आहेत. त्याचेही पडसाद मंत्रिमंडळ बैठकीत उमटू शकतात, असे सूत्रांनी सांगितले.