गोव्यात मुख्यमंत्री रोजगार हमी योजनेचा 7 हजार जणांना लाभ
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2017 12:50 PM2017-10-09T12:50:43+5:302017-10-09T12:53:05+5:30
गोव्यात मुख्यमंत्री रोजगार हमी योजनेचा तब्बल 7 हजार जणांनी लाभ घेतला असून या योजनेंतर्गत आतापर्यंत 80 कोटी रुपये वितरित झाले आहेत. आर्थिक विकास महामंडळातर्फे (ईडीसी) राबवल्या जाणा-या या अल्पव्याजी कर्जाच्या माध्यमातून दिवसाकाठी सरासरी चारजण उद्योजकतेकडे वळत आहेत.
पणजी : गोव्यात मुख्यमंत्री रोजगार हमी योजनेचा तब्बल 7 हजार जणांनी लाभ घेतला असून या योजनेंतर्गत आतापर्यंत 80 कोटी रुपये वितरित झाले आहेत. आर्थिक विकास महामंडळातर्फे (ईडीसी) राबवल्या जाणा-या या अल्पव्याजी कर्जाच्या माध्यमातून दिवसाकाठी सरासरी चारजण उद्योजकतेकडे वळत आहेत.
महामंडळाचे अध्यक्ष माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येंकर म्हणाले की, ‘ही योजना आता अधिक सुटसुटीत करण्यात आली आहे. गरजू तरुणांना उद्योगासाठी अर्थसाहाय्य मिळावे म्हणून गावागावात शिबिरे घेतली जातात. सीडीपीआर आणि वेर्णा येथील आग्नेल आश्रम या संस्थांकडे हातमिळवणी केली असून या संस्थांचे प्रतिनिधी गावागावात जाऊन मार्गदर्शन करतात. गरजूंना या योजनेसाठी अर्ज भरुन देणे तसेच अन्य तत्सम कामे करतात. आतापर्यंत 7 हजार उद्योजक तयार केले असून सुमारे 80 कोटी रुपये वितरित झालेले आहेत.’
छोट्या-मोठ्या उद्योगांमध्ये गुंतवणुकीसाठी कर्ज या योजनेच्या माध्यमातून दिले जाते. सरकारने अलीकडेच या योजनेसाठी उत्पन्न आणि वयोमर्यादा शिथिल केलेली आहे. वार्षिक 10 लाख रुपये उत्पन्न असलेल्यांनाही आता लाभ मिळणार आहे. या योजनेचा लाभ अधिकाधिक गरजूंना घेता यावा आणि उद्योजकता वाढावी यासाठी योजनेतील काही अटी शिथिल करण्यात आल्या आहेत.
उत्पन्नमर्यादा तसेच वयाच्याबाबतीत सवलत देण्यात आलेली आहे. 18 ते 45 वर्षे वयापर्यंतची व्यक्ती आता या योजनेत उद्योग, व्यवसायासाठी कर्ज मिळवू शकते. विधवा, अपंग, मागास, अनुसूचित जमाती व ओबीसी यांना 5 वर्षांची शिथिलता देण्यात आलेली आहे. पात्रतेसाठी वार्षिक उत्पन्नमर्यादा ३ लाख रुपयांवरुन १0 लाख रुपये करण्यात आली आहे. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दहा लाख रुपयांपर्यंत असले तरी या योजनेचा लाभ घेता येईल.
सिद्धार्थ कुंकळ्येंकर, अध्यक्ष, ईडीसी