70 कोटींच्या जमीनप्रकरणी मुख्य सचिवांकडून लोकायुक्तांना माहिती सादर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 08:17 PM2018-11-22T20:17:49+5:302018-11-22T20:21:53+5:30
पणजी : सुभाष शिरोडकर व त्यांच्या कुटूंबियांची शिरोडा येथील जमीन सरकारने 70 कोटी रुपयांची नुकसान भरपाई देऊन संपादित केल्याविषयी ...
पणजी : सुभाष शिरोडकर व त्यांच्या कुटूंबियांची शिरोडा येथील जमीन सरकारने 70 कोटी रुपयांची नुकसान भरपाई देऊन संपादित केल्याविषयी सगळी माहिती व रेकॉर्ड्स आपल्याला सादर करा अन्यथा आपल्यासमोर हजर व्हा, अशी सूचना लोकायुक्तांनी देत आक्रमक भूमिका घेतल्यानंतर मुख्य सचिव धमेंद्र शर्मा यांनी सगळा तपशील लोकायुक्तांकडे पाठवून दिला आहे. त्यामुळे त्यांना आता लोकायुक्तांसमोर हजर व्हावे लागणार नाही.
शिरोडकर यांनी गेल्या महिन्यातच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तत्पूर्वी ते काँग्रेसमध्ये असताना सरकारने त्यांची 1 लाखापेक्षा जास्त चौरस मीटर क्षेत्रफळाची जमीन संपादित केली व त्यासाठी त्यांना 70 कोटी रुपयांची भरपाई देणे मान्य केले. पहिला हप्ता म्हणून 9 कोटी रुपयांचा धनादेश दिला गेला. उद्या शुक्रवारी 23 रोजी लोकायुक्तांसमोर याविषयी सुनावणी होईल. तथापि, यापूर्वी या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते आयरिश रॉड्रीग्ज यांची तक्रार आल्यानंतर लोकायुक्तांनी गंभीर दखल घेतली व प्राथमिक चौकशी सुरू केली. मुख्य सचिव शर्मा यांनी जमीन संपादनाविषयीची सगळी कागदपत्रे व सगळेच रेकॉर्ड्स आपल्याला सादर करावे अशी सूचना लोकायुक्तांनी केली होती.
तथापि, मुख्य सचिव माहिती सादर करण्यात अपयशी ठरल्यानंतर लोकायुक्तांनी अतिशय स्पष्ट भूमिका घेत सगळ्य़ा माहितीसह आपल्यासमोर हजर व्हा, असा आदेशच दिला होता. त्यामुळे मुख्य सचिवांनी लगेच सगळी माहिती लोकायुक्तांच्या कार्यालयात पाठवून देऊन स्वत:ची सुटका करून घेतली. अन्यथा त्यांना उद्या शुक्रवारी लोकायुक्तांसमोर हजर व्हावे लागले असते. यापूर्वी कुठल्याच मुख्य सचिवांवर लोकायुक्तांसमोर हजर होण्याची वेळ आलेली नाही.