सांताक्लॉजच्या आगमनाने बच्चे कंपनी खूश, अनेक भागात मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2017 06:26 PM2017-12-25T18:26:38+5:302017-12-25T18:26:54+5:30
शहरे सजली, गाव सजले नाताळाच्या तसेच येशू ख्रिस्ताच्या आगमनानिमीत्त रोषणाईने न्हावून गेलेल्या परिसराने वातावरण आनंदीमय झाले आहे. येशू ख्रिस्ताच्या आगमनाने नाताळाच्या दिवशी हर्ष उल्हासित झालेल्या वातावरणात सर्वांना प्रतिक्षा लागून राहते ती सांताक्लॉजच्या आगमनाची.
म्हापसा : शहरे सजली, गाव सजले नाताळाच्या तसेच येशू ख्रिस्ताच्या आगमनानिमीत्त रोषणाईने न्हावून गेलेल्या परिसराने वातावरण आनंदीमय झाले आहे. येशू ख्रिस्ताच्या आगमनाने नाताळाच्या दिवशी हर्ष उल्हासित झालेल्या वातावरणात सर्वांना प्रतिक्षा लागून राहते ती सांताक्लॉजच्या आगमनाची. सांताक्लॉजने मुलांना भेटीचे नजराणे देत आनंदाच्या वातावरणात भर घालून द्विगुणीत केला आहे.
येशू ख्रिस्ताच्या जन्मानिमित्त सर्व चर्चमध्ये प्रार्थना सभा संपन्न झाल्यानंतर गावागावात, शहरातून त्यांच्या जन्माचा आनंदोत्सव साजरा करण्यात सुरुवात झाली. ऐकमेकांना शुभेच्छा देण्यात आल्या. कॅरल संगीताच्या धुनी सर्वत्र वाजू लागल्या आहेत. अनेक चर्चित झालेल्या प्रार्थना सभावेळी येशू ख्रिस्ताचा जन्माचे देखावे सुद्धा सादर करण्यात आले. तसेच चर्चच्या आवारात गोठ्याच्या रुपात देखावे सुद्धा तयार करण्यात आले आहेत. प्रार्थनेनंतर अनेक भागात नृत्याचे मनोरंजनात्मक कार्यक्रमही आयोजित करण्यात आले होते. नाताळ निमित्त सर्वत्र करण्यात आलेल्या विद्युत रोषणाईने परिसर न्हावून गेला आहे. या रोषणाईला जोड नाताळाचे प्रतिक असलेले विविध आकर्षक रंगाने तयार करुन सजलेली नक्षत्रे लावण्यात आलेली आहेत.
मध्यरात्रीची प्रार्थना तसेच नृत्याच्या कार्यक्रमानंतर सकाळी एकमेकांच्या घरी जाऊन शुभेच्छा देण्यावर लोकांनी भर दिला. येशू ख्रिस्ताचा जन्म हा सर्व समाजातील लोकांना आंनददायी ठरणारा असल्याने त्यांच्या आगमनाने समाजातील सर्व लोकात एकात्मतेचा, सद्भावनेचा शांततेचा संदेश पसरवण्यात आला. चर्चमधील प्रार्थनातून सुद्धा हाच संदेश सर्वत्र देण्यात आला.
दिवसाच्या तिस-या प्रहराला संध्याकाळच्या वेळेला चर्चच्या प्रांगणात लहान मुलांसाठी विविध प्रकारच्या मनोरंजनात्मक खेळांचे तसेच इतर विविध वयोगटातील लोकांसाठी कार्यक्रमाचे आयोजन सुद्धा करण्यात आले होते. हा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर सर्वांना खास करुन मुलांना प्रतिक्षा असलेल्या सांताक्लॉजचे आगमन होऊन त्यांनी सर्व मुलांना सजवून तयार केलेल्या पॅकेटातील चॉकलेट्स तसेच इतर गोड पदार्थांचे वाटप केले.
वर्षभर लोक या सणाची प्रतीक्षा मोठ्या आतुरतेने करीत असतात. सण सुरु झाला की त्यांच्या उत्साहावर उधाण येते. पुढील किमान आठवडाभर नवीन वर्षाला सुरुवात होईपर्यंत सणमय वातावरण सुरुच असते. हा सण आपल्या कुटुंबासमवेत साजरा करावा यासाठी विदेशात स्थायिक झालेले अनिवासीय गोवेकर तसेच विदेशात नोकरी निमित्त वास्तव्य करुन असलेले गोवेकर नाताळ निमित्त सुट्ट्या घेऊन गोव्यात कुटुंबासहित नित्यनेमाने येत असतात. नाताळनंतर नवीन वर्ष साजरे होईपर्यंत थांबून पुन्हा माघारी विदेशात निघून जातात. नाताळ सणाच्या संस्कृतीचे प्रतिक तसेच वैशिष्ठ मानले जाणारे पदार्थ धोधोल, बिबींका, कल-कल, डोस तसेच करंज्यासारखे गोड पदार्थ नाताळ सणातील पारंपारिक पदार्थ मानले जातात. आजच्या दिवशी प्रत्येकाच्या घरात या पदार्थांचा स्वाद तसेच चव प्रत्येकाला घ्यायला मिळत असतो. येशू ख्रिस्ताच्या जन्माचा हा सोहळा समाजातील सर्वांना सुखदायी तसेच आनंदायी ठरणारा असतो.