China Coronavirus: चीनच्या शिष्टमंडळाची गोवा भेट स्थगित, पर्यटन विषयक होणार होती चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2020 02:22 PM2020-02-09T14:22:01+5:302020-02-09T14:22:14+5:30
गोव्याचे शिष्यमंडळ तेथील ट्रॅव्हल मार्टमध्ये सहभागी झाले होते.
पणजी : चीनमध्ये कोरोना व्हायरसने थैमान घातल्याने तेथील शिष्टमंडळाने गोवा भेट स्थगित केली. पर्यटन विषयक देवाण-घेवाण व तत्सम विषयावर चर्चा करण्यासाठी शिष्टमंडळ रविवारी गोव्यात येणार होते.
गोव्यात पर्यटन व्यवसायिकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या टूर अँड ट्रॅव्हल असोसिएशन ऑफ गोवा (टीटीएजी) चे अध्यक्ष सावियो मेशियस यांनी सांगितले की, शिष्टमंडळाची ही भेट स्थगित करण्यात आली आहे. चीनमधील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी गोवा सरकारचा प्रयत्न आहे. काही महिन्यांपूर्वी गोव्याच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाने चीनला भेट देऊन तेथील पर्यटक गोव्यात यावेत यासाठी प्रयत्न केले होते.
गोव्याचे शिष्यमंडळ तेथील ट्रॅव्हल मार्टमध्ये सहभागी झाले होते. आता चिनी शिष्टमंडळाची नियोजित गोवा भेट हा पर्यटन विषयक बाजारपेठ मिळविण्यासाठी विपणन धोरणाचा हा एक भाग होता. ऑनलाइन आणि ऑफलाइन बुकिंग तज्ञ, फोटोग्राफर्स, मॉडेल्स आधी कंटेंट क्रियेटर या शिष्टमंडळात सहभागी होणार होते. गोव्यातील पर्यटन व्यावसायिकांनी चीनची बाजारपेठ मिळविण्यासाठी प्रयत्न चालविले होते खरे, परंतु आता चीनमध्ये जीवघेण्या विषाणूचा फैलाव झाल्याने व्यावसायिक धास्तावले आहेत.
टीटीएजीचे माजी अध्यक्ष तथा तारांकित हॉटेलमालक राल्फ डिसोझा म्हणाले की, चीन व भारत या पर्यटनासाठी सध्या मोठ्या बाजारपेठा ठरल्या आहेत. चीनमधील पर्यटकांची बाजारपेठ मिळवण्यासाठी गोव्यात मोठा वाव आहे, परंतु सध्या तेथे कोरोना व्हायरसचा फैलाव झाल्याने तूर्त चीनमधील पर्यटक मिळवण्याचे प्रयत्न स्थगित ठेवावे लागत आहेत.