स्क्रॅपार्डमध्ये क्लोरीन गळती, ५ जणांची प्रकृती अत्यावस्थ
By वासुदेव.पागी | Published: June 27, 2024 03:13 PM2024-06-27T15:13:29+5:302024-06-27T15:13:47+5:30
-मेरशी स्क्रॅपयार्डमधील घटना पणजी.
वासुदेव पागी, पणजीः मेरशी येथील स्क्रॅपयार्डमध्ये झालेल्या क्लोरीन गॅस गळतीमुळे ५ जणांची प्रकृती बिघडी आबे. पाचही जणांना उपचारासाठी तातडीने गोवा वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना गुरूवारी सकाळी पाउणे सात वाजण्याच्या सुमारास घडली. क्लोरीन गळतीमुळे आजुबाजुच्या परिसरातील लोकांना त्रास होऊ लागला व अस्वस्थ वाटू लागले. त्यातच पाच जणांची प्रकृती अधिकच बिघडल्याने त्यांना गोमेकॉत दाखल करण्यात आले.
या घटनेची माहिती स्थानिक पोलीस व अग्नीशमन दलाला देण्यात आल्यानंतर तेथील फायर फायटर्स घटनास्थळी दाखल झाले. परिस्थितीचे गांभिर्य ओळखून एका फायर फायटरने अशा घटनांना सामोरे जाण्यास तरबेज असलेला आघाडीचा फायर फायटर अमित रिवणकर यांना याची माहिती दिली. रीवणकर हा मेरशी परिसरातील रहिवासी आहे. परंतु तो सुट्टीवर होता. परंतु खबर मिळताच तो घटनास्थळी धावून आला. खोर्लीतील सिंजेंटा कंपनीशी संपर्क करून तिथे क्लोरीन गळती होणारा सिलिंडर घेऊन येत असल्याची माहिती दिली आणि सर्व व्यवस्था करून ठेवण्यास सांगितले. मोठी जोखीम घेऊन पोलिसांच्या मदतीने फायर फायटर्सने सिलिंडर सिंजेटा कंपनीच्या प्लांटवर नेला आणि त्याचा बंदोबस्त केला. दरम्यान गोमेकॉत उपचारासाठी नेण्यात आलेल्या सर्व पाचही जणांच्या प्रकृतीत सुधार होत असल्याचे आढळून आले आहे. तसेच ते धोक्याच्याा बाहेर आले आहेत. या घटनेमुळे राज्यातील बेकायदेशीर स्क्रॅप यार्डचे बेकायदेशीर कारनामे पुन्हा एकदा उघड झाले आहेत. या स्क्रॅपयार्डमध्ये क्लोरीन सिलेंडर ठेवण्याची परवानगी नसताना या ठिकाणी एक नव्हे तर तब्बल तीन क्लोरीन सिलेंडर आणलेच कसे याचीही चौकशी होणार आहे