खुनाचा लवकर छडा लावा
By admin | Published: September 20, 2015 01:57 AM2015-09-20T01:57:28+5:302015-09-20T01:57:52+5:30
पेडणे : तळेवाडा-धारगळ येथील दुहेरी खून प्रकरणी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी गंभीर दखल घेतली असून वरिष्ठ पोलिसांना
पेडणे : तळेवाडा-धारगळ येथील दुहेरी खून प्रकरणी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी गंभीर दखल घेतली असून वरिष्ठ पोलिसांना लवकरात लवकर या खुनाचा छडा लावण्याची सूचना केली आहे.
एक कामगार ताब्यात
धारगळ येथील रेजिनाल्ड गुदिन्हो व जेसी गुदिन्हो या वृद्ध दाम्पत्याचा झालेला निर्घृण खून हा कामगारांनीच केला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी बांधला असतानाच हा खून चोरीच्या उद्देशाने झाला नसून कामगारांनीच केला असावा, असे मत ग्रामस्थांनीही व्यक्त केले आहे.
आतापर्यंत पेडणे पोलिसांनी १६ कामागारांना पोलीस स्थानकात आणून त्यांची उलट तपासणी केली आहे. तर एका कामगारावर पोलिसांचा संशय असून तो कामगार पोलिसांच्या ताब्यात आहे. जोपर्यंत रेजिनाल्ड यांची मुले आखातातून येत नाहीत, तोपर्यंत या खुनामागचे रहस्य उलगडणार नाही. गुन्हेगारांनी कसला तरी राग डोक्यात घेऊन सपासप कोयत्याने वार करून वयोवृध्दांचा खून केला आहे. या खुनाने संपूर्ण तालुका हादरला आहे. लोक हळहळ व्यक्त करीत आहेत.
या खुनामागे जे कोणी असतील त्यांना पोलिसांनी लवकर अटक करून कडक शिक्षा द्यावी, अशी मागणी धारगळचे माजी सरपंच भूषण ऊर्फ प्रदीप नाईक यांनी केली आहे.
सध्या धारगळ गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे गुन्हेगारांना लवकर अटक करण्याची मागणी भूषण नाईक यांनी केली आहे. गुदिन्हो यांचा दूध विक्रीचा व्यवसाय होता. त्यांच्याकडे अनेक कामगार होते. कामासंबंधातील व्यवहारांवरून गुदिन्हो व कामगारांमध्ये अनेकवेळा शाब्दिक खटके उडायचे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रेजिनाल्ड गुदिन्हो यांनी एका कामगाराला मारहाण करून कामावरून काढले होते. त्या कामगाराला पैसेही दिले नव्हते, तसेच एका वर्षांनतर त्याच कामगाराने रेजिनाल्ड गुदिन्हो यांच्यावर हल्ला केला होता. त्याच कामगाराने हा खून केला असावा, असाही संशय व्यक्त केला जात आहे.
(प्रतिनिधी)