भाजपसाठी मते मिळवण्यात 'ख्रिस्ती आमदार' पडले कमी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2024 10:55 AM2024-06-06T10:55:14+5:302024-06-06T10:55:41+5:30
नुवे मतदारसंघात फुटीर आमदार आलेक्स सिक्वेरा यांना मंत्रिपद देऊनही भाजपला काहीच फायदा झाला नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : भाजपला मते मिळवून देण्यात ख्रिस्ती आमदार कमी पडल्याचे मंगळवारी लोकसभा निवडणुकीच्या निकाल अंती मतांच्या आकडेवारीवरून उघड झाले आहे.
नुवे मतदारसंघात फुटीर आमदार आलेक्स सिक्वेरा यांना मंत्रिपद देऊनही भाजपला काहीच फायदा झाला नाही. या मतदारसंघात भाजपची घोर निराशा झाली. काँग्रेसचे उमेदवार विरियातो फर्नांडिस यांना तब्बल १६,३६५ तर भाजप उमेदवार पल्लवी धंपे यांना केवळ २,६७७ मते मिळाली. विरियातो यांनी या मतदारसंघात १३,६८८ मतांची आघाडी घेतली. सासष्टीतील अल्पसंख्याकांना संतुष्ट करण्यासाठी सिक्वेरा यांना मंत्रिपद देण्यात आले होते. परंतु, प्रयोग काही यशस्वी झाला नाही.
कुडतरीत अपक्ष आमदार रेजिनाल्ड लॉरेन्स हे भाजपसोबत सक्रिय होते. परंतु, तिथे काँग्रेसला ९,१८८ मतांची आघाडी मिळाली. विरियातो यांना १४,९७५ तर पल्लवी यांना ५,७८७ मते मिळाली. कुठ्ठाळीत ही अपक्ष आमदार आंतोन वास भाजप उमेदवारासाठी वावरले. परंतु, मतदारांनी काँग्रेस उमेदवार विरियातो यांना १२,३७७ तर पल्लवी यांना ९४५४ मते दिली. येथेही काँग्रेसला आघाडी मिळाली.
उत्तर गोव्यातही भाजपचे खिस्ती आमदार असलेल्या मतदारसंघांमध्ये यापेक्षा वेगळी स्थिती नाही. कळंगुट मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार रमाकांत खलप यांना ९५८६ तर भाजप उमेदवार श्रीपाद नाईक यांना ७५३६ मते मिळाली आहेत. काँग्रेसने येथे २,०५० मतांची आघाडी घेतली. २०१४ साली काँग्रेसला केवळ ११५ मतांची अल्प आघाडी येथे मिळाली होती. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत येथे काँग्रेसने २,४५८ मतांची आघाडी घेतली होती. सांताक्रुझमध्ये रुदोल्फ फर्नांडिस यांच्यासाठी हा निकाल आगामी विधानसभा निवडणुकीसाठी धोक्याची घंटा ठरला आहे. या मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार रमाकांत खलप यांना ९९४३ तर भाजपला ८९८५ मते मिळाली आहेत.