गोव्यात नाताळ सणाची जय्यत तयारी, देखावे सजविण्याचं काम अंतिम टप्प्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2017 11:50 AM2017-12-13T11:50:17+5:302017-12-13T11:54:53+5:30
ख्रिस्ती बांधवांच्या नाताळ सणाची जय्यत तयारी सर्वत्र सुरु झाली आहे.
म्हापसा- गोव्यातील धार्मिक एकतेचे तसेच सलोख्याचे आदर्श असे उदाहरण असलेला, धार्मिक सीमांचे उल्लंघन करुन सर्वांना एकत्र आणणारा नाताळ सण अवघ्या १२ दिवसांवर येवून ठेपलेला आहे. सर्व धर्माच्या लोकांमध्ये आनंद वाटणारा, नाते दृढ करणारा ख्रिस्ती बांधवांच्या नाताळ सणाची जय्यत तयारी सर्वत्र सुरु झाली आहे. सणाचे सर्वात मोठे आकर्षण असलेला येशू ख्रिस्ताच्या जन्माचा देखावा अर्थात गोठे तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहेत.
नाताळ सणाचे वैशिष्ठ असलेले हे गोठे (क्रिब्स) विविध आकारानुसार बनवले जातात. तरूण-तरूणींनी या कामासाठी स्वत:ला झोकून घेतले आहे. गोठे तयार करताना अत्याधुनिक सुविधांचा, नवीन तंत्राचा वापर केला जातो. हे करताना त्या मागची परंपरा, संस्कृती नष्ट होणार नाही याची काळजी बाळगली जाते. राज्यातील प्रत्येक गाव स्तरावर गोठ्यांच्या स्पर्धांचे आयोजन केले जात असल्याने आपला गोठा सर्वात जास्त कसा आकर्षक बनेल याची दक्षता बाळगली जाते. होत असलेल्या स्पर्धांना आकर्षक अशी बक्षिसे सुद्धा दिली जातात.
गोठे बनवताना माती तसेच वाळूचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. त्यात गहू किंवा नाचणी रुजवून ते उगवले जाते. गोठ्यावर छप्पर तसेच भिंती बनवण्यासाठी सुकलेल्या गवताचा, माडांच्या झावळीचा वापर केला जातो. गोठ्यात गुरांसोबत, बकऱ्या, मेंढरे, घोडे, उंट किंवा इतर जनावरांच्या प्रतिकृती वापरुन गोठ्याचे स्वरुप दिले जाते.
गोठ्याला नैसर्गिक बनवण्यासाठी त्याला आकर्षक किंवा सुंदर बनवण्यासाठी वाहते पाण्याचे पाट, बर्फाचा देखावा करायचा असल्यास कापसापासून बनवलेले बर्फाचे ढग काही वेळा वाळवंटातील दृष्य सुद्धा बनवले जाते. देखाव्यानुसार मागच्या गोठ्याच्या मागच्या बाजूला डोंगराचे दृष्य सुद्धा तयार केले जाते. हल्लीच्या काळात थर्मकोलचा सुद्धा वापर केला जातो.
गोठा तयार करताना आतील मंद वातावरण तेवत ठेवण्यासाठी मंद प्रकाश देणारे दिवे वापरले जातात. वेगवेगळ्या आकाराची नक्षत्रे त्यात लावली जातात. चर्चमधील गोठे गावातील किंवा संबंधीत परिसरातील लोक एकत्रीत येऊन बनवतात. त्यामुळे इतर गोठ्यापेक्षा तो सर्वात जास्त सुबक व मोठा बनवला जातो. गोठ्याच्या मधोमध गवताच्या कुशीत असलेला बाळ येशू ख्रिस्त सोबत मदर मेरी, येशू ख्रिस्ताला पाहण्यासाठी आलेले देवदूत (एंजल) तसेच येशू ख्रिस्ताच्या स्वागतासाठी तसेच त्यांना पाहण्यासाठी आलेले थ्रि किंग्स (तीन राजा) यामुळे त्यातील आकर्षणात भर पडते. गोठ्याच्या बाहेर तयार केलेली ख्रिसमस ट्री परिसराच्या आकर्षणात आणखीन भर घालते.
गुलाबी थंडीच्या दिवसात साजरा होणाऱ्या या नाताळच्या सणातील गोठे नवीन वर्षाच्या आगमनापर्यंत कायम ठेवले जातात. तयार केलेले गोठ्यांचे हे देखावे पाहण्यासाठी लोकांची गर्दी सुद्धा होत असते. विविध धर्मातील लोक त्यांच्यात असलेल्या धर्माच्या सीमा, मर्यादा विसरुन एकमेकांच्या घरी जाऊन सणाच्या शुभेच्छा देतात. शुभेच्छा देताना सणानिमित्त बनवलेले गोडधोड पारंपारिक पदार्थाची चव घेण्यास विसरत नाहीत. घरात बनवलेले हे पदार्थ एकमेकांना वाटण्याची परंपरा आज सुद्धा पाळली जाते. त्यामुळे सर्व धर्मात आनंद वाटणारा, वाढवणारा सण म्हणून नाताळ सणाकडे पाहिले जाते.