नाताळाची तयारी अंतिम टप्प्यात; गोव्यात विद्युत रोषणाई
By काशिराम म्हांबरे | Published: December 23, 2023 01:42 PM2023-12-23T13:42:38+5:302023-12-23T13:42:59+5:30
गोठे बनवताना माती तसेच वाळूचा वापर केला जातो. त्यात गहू किंवा नाचणी रुजवून ते उगवले जातात.
म्हापसा - गोव्यातील धार्मिक एकतेचे, सलोख्याचे आदर्श असे उदाहरण असलेला, धार्मिक सीमांचे उल्लंघन करुन सर्वांना एकत्रित आणणाऱ्या व एकत्रीतपणे नांदवणारा नाताळ सण एका दिवसावर येऊन ठेपलेला आहे. सर्व धर्मातील लोकांचे नाते दृढ करणारा ख्रिस्ती बांधवांच्या येशू ख्रिस्त यांचा जन्मदिन म्हणून जगभर साजरा होणाऱ्या या सणाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. विद्युत रोषणाईने परिसर उजळून गेला आहे.
सणाचे सर्वात मोठे आकर्षण असलेला येशू ख्रिस्ताच्या जन्माचा देखावा अर्थात गोठे (क्रिब्स) तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. गोठे तयार करताना अत्याधुनिक सुविधांचा, नवीन तंत्राचा वापर करण्यात आला आहे. मात्र त्या मागची परंपरा, संस्कृती नष्ट होणार नाही याची काळजी बाळगण्यात आली आहे. पूर्व तयारीचा एक भाग म्हणून अनेक चर्चीत प्रार्थना सभांचे आयोजन करण्यात आले आहे. सणा निमीत्त कॅरल गीतांच्या मधुर धुंदीतून वातावरणाची निर्मिती करण्यात आली आहे. गावा गावांतून कॅरेल गितांचे गायन, हातात कंदील, पारंपारिक नाताळाची वेषभूषा करून फेºया काढण्यात आल्या आहेत. बाजारपेठाही नाताळाच्या सामानांनी भरून गेल्या आहेत.
गोठे बनवताना माती तसेच वाळूचा वापर केला जातो. त्यात गहू किंवा नाचणी रुजवून ते उगवले जातात. गोठ्यावर छप्पर तसेच भिंती बनवण्यासाठी सुकलेल्या गवताचा, माडांच्या झावळीचा वापर केला जातो. गोठ्यात गुरांसोबत, बकऱ्या, मेंढरे, घोडे, उंट किंवा इतर जनावरांच्या प्रतिकृती वापरुन गोठ्याचे स्वरुप दिले जाते. चर्च परिसरातील गोठा आकाराने सर्वात मोठा बनवला जातो. गोठ्याला नैसर्गिक बनवण्यासाठी त्याला आकर्षक किंवा सुंदर बनवण्यासाठी वाहते पाण्याचे पाट, बफार्चा देखावा करायचा असल्यास कापसापासून बनवलेले बर्फाचेढग काही वेळा वाळवंटातील दृष्य सुद्धा बनवले जाते. देखाव्यानुसार गोठ्याच्या मागच्या बाजूला डोंगराचे दृष्य सुद्धा तयार केले जाते.
गुलाबी थंडीच्या दिवसात साजरा होणाऱ्या या नाताळच्या सणातील गोठे नवीन वर्षाच्या आगमनापर्यंत कायम ठेवले जातात. तयार केलेले गोठ्यांचेहे देखावे पाहण्यासाठी लोकांची गर्दी सुद्धा होत असते. विविध धर्मातील लोक आपआपसातील धर्माच्या सीमा, मर्यादा विसरुन एकमेकांच्या घरी जाऊन सणाच्या शुभेच्छा देतात. शुभेच्छा देताना सणानिमित्त बनवलेले गोडधोड पारंपारिक पदार्थाची चव घेण्यास विसरत नाहीत. घरात बनवलेले हे पदार्थ एकमेकांना वाटण्याची परंपरा आज सुद्धा पाळली जाते. त्यामुळे सर्व धर्मात आनंद वाटणारा, वाढवणारा सण म्हणून नाताळ सणाकडे पाहिले जाते. निसर्गाच्या सानिध्यात जन्माला येणाºया येशू ख्रिस्ताच्या जन्माचा हा सोहळा समाजातील सर्वांना सुखदायी तसेच आनंदायी ठरत असतो.