आजचा अग्रलेखः चर्चिलना काय महत्त्व? 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2023 10:15 AM2023-04-25T10:15:31+5:302023-04-25T10:17:48+5:30

चर्चिल हे ज्योकिमचे बंधू, चर्चिल किंवा मिकी पाशेको यांच्या मागेही आता पूर्वीचा जनाधार नाही.

churchill alemao support bjp in lok sabha election and its political consequences | आजचा अग्रलेखः चर्चिलना काय महत्त्व? 

आजचा अग्रलेखः चर्चिलना काय महत्त्व? 

googlenewsNext

एक काळ असा होता की, चर्चिल आलेमाव, फ्रान्सिस सार्दिन, स्वर्गीय डॉ. विल्फ्रेड डिसोझा, ज्योकिम आलेमाव, लुईझिन फालेरो यांना गोव्याच्या राजकारणात खूपच महत्त्व होते. यापैकी सार्दिन अजून काँग्रेसचे खासदार आहेत, पण त्यांच्या मागे जनमत नाही. माजी मुख्यमंत्री लुईझिन हे अपमानित होऊन नुकतेच तृणमूल कॉंग्रेसमधून बाहेर पडले आहेत. कॉंग्रेस सोडल्यानंतर फालेरो यांचे महत्त्वच गेले. राज्यसभेचे खासदार होण्याची त्यांची हौस तेवढी पूर्ण झाली. आपली टर्म मात्र ते पूर्ण करू शकले नाहीत. फालेरो यांनी काँग्रेस सोडून तृणमूल काँग्रेसमध्ये जाणे ही हाराकिरी होती, असे 'लोकमत'ने याच स्तंभात म्हटले होते. ते खरे ठरले. फालेरो यांना तृणमूलमध्ये व गोव्याच्या राजकारणातही पूर्वीचे महत्त्व राहिलेले नाही. विद्यमान विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांचे वडील ज्योकिम आलेमाव यांचाही एकेकाळी मोठा आब होता. आता ते आजारी असल्याने राजकारणात सक्रिय नाहीत. चर्चिल हे ज्योकिमचे बंधू, चर्चिल किंवा मिकी पाशेको यांच्या मागेही आता पूर्वीचा जनाधार नाही.

चर्चिल यांनी दोन दिवसांपूर्वीच लोकसभा निवडणुकीसाठी आपली भूमिका जाहीर केली. निवडणूक तशी दूर असली, तरी चर्चिलना धीर धरवत नाही. चर्चिलसारखे नेते पूर्वी पडद्याआडून सेटिंगचे राजकारण करायचे. युगोडेपा पक्ष त्यासाठीच प्रसिद्ध होता. याविषयी राधाराव ग्रासियस कदाचित जास्त माहिती देऊ शकतील. आता आलेमाव उघडपणेच मैदानात उतरले आहेत. दाखव-लपत अशी भूमिका न घेता त्यांनी थेट सांगून टाकले की, आपला पाठिंबा लोकसभा निवडणुकीसाठी भाजपला राहील. मुख्यमंत्री सावंत यांच्या नेतृत्त्वाचे चर्चिल यांनी कौतुक केले. गोव्यातील दोन्ही जागा भाजपच जिंकेल व पुढील दहा-पंधरा वर्षे केंद्रात भाजपच सत्तेत असेल, असे विधान बाणावलीच्या बाणासुराने केले आहे. आमदार विजय सरदेसाई म्हणतात त्याप्रमाणे चर्चिल ज्योतिषीच बनले आहेत. चर्चिलना स्वतः ला गेल्या निवडणुकीत एका बाणावली मतदारसंघात जिंकता आले नाही. ज्या वार्का बाणावलीत त्यांचे घर आहे, त्या मतदारसंघानेदेखील त्यांना पराभूत केले. आपचे नवखे उमेदवार वेंझी व्हीएस यांनी चर्चिलना २०२२ च्या निवडणुकीत धूळ चारली. मात्र, आलेमाव यावरून काही शिकले आहेत, असे दिसत नाही. त्यांनी शिल्लक नसलेले राजकीय वजन दाखविण्यास आरंभ केला आहे.

दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघात भाजपची यावेळी तशी कसोटीच आहे. भाजपकडे संख्येने जास्त आमदार आहेत. त्यामुळे 'भिवपाची गरज ना' असे मुख्यमंत्री म्हणतील. दिगंबर कामत, सुदिन ढवळीकर, रवी नाईक, सुभाष शिरोडकर, रमेश तवडकर, आलेक्स रेजिनाल्ड, बाबू कवळेकर आदी सर्वच नेते सोबत आहेत. मात्र, दक्षिणेतील ख्रिस्ती मतदारांची (व काही शिक्षित हिंदूदेखील) नाडी अजून भाजपला कळलेली नाही. गृहमंत्री अमित शाह यांच्या फर्मागुडीतील सभेवेळी दक्षिणेतील आमदार हवी तेवढी गर्दी जमवू शकले नाहीत. त्यामुळेच उत्तर गोव्यातील आमदारांना सांगून भाजपला फर्मागुडीत लोक जमवावे लागले. दक्षिण गोव्यातील ख्रिस्ती मतदार त्या गर्दीत खूप कमी होते. भाजपने खूप कष्ट घेऊनदेखील ख्रिस्ती लोक शाह यांच्या सभेला जास्त आले नाहीत, याची नोंद पक्षानेही घेतली आहे. काँग्रेसने जर एखादा प्रभावी ख्रिस्ती धर्मीय उमेदवार लोकसभा निवडणुकीवेळी उभा केला तर दक्षिणेत काय होईल, याचा एक ढोबळ अंदाज काढता येतो. अर्थात निवडणूक अजून तेवढी जवळ नाही. २०१९ साली देशात मोदी लाट असतानादेखील दक्षिण गोव्यात भाजपचा पराभव झाला होता, हेही लक्षात घ्यावे लागेल.

चर्चिलनी भाजपला पाठिंबा देणे म्हणजे दक्षिणेतील ख्रिस्ती मतदार आणखी नाराज होणे, असा अर्थ होतो. निवडणुका अगदी जवळ आल्या की, खिस्ती धर्मगुरू स्वतः चे कार्ड उघड करतात. मग हे धर्मगुरू आलेक्स सिक्वेरा किंवा माविन गुदिन्हो यांचेही ऐकत नाहीत. गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी मंत्री नीलेश काब्राल हे कुडचडेत कसेबसे जिंकले. केपेत बलाढ्य वाटणाऱ्या बाबू कवळेकरांना गेल्या विधानसभा निवडणुकीत हिंदू मतदारांनीच पाडले. दक्षिणेतील मतदारांनी अगोदरच चर्चिलसह अनेक ख्रिस्ती नेत्यांना नाकारलेले आहे. चर्चिल व भाजपची मैत्री यातून भाजपला किती लाभ होईल, हे कदाचित निवडणुकीवेळीच कळेल.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: churchill alemao support bjp in lok sabha election and its political consequences

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.