चर्चिल यांच्या पदरी निराशाच
By admin | Published: September 15, 2015 02:28 AM2015-09-15T02:28:58+5:302015-09-15T02:29:11+5:30
पणजी : लुईस बर्जर लाच प्रकरणात अटकेत असलेले माजी सार्वजनिक बांधकाममंत्री चर्चिल आलेमाव यांचा जामीन अर्ज सोमवारी उच्च न्यायालयानेही फेटाळला
पणजी : लुईस बर्जर लाच प्रकरणात अटकेत असलेले माजी सार्वजनिक बांधकाममंत्री चर्चिल आलेमाव यांचा जामीन अर्ज सोमवारी उच्च न्यायालयानेही फेटाळला. त्यांना जामीन नाकारण्याच्या विशेष न्यायालयाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करताना खंडपीठानेही हा निवाडा उचलून धरला. त्यामुळे त्यांना कोलवाळ तुरुंगातच राहावे लागणार आहे.
या प्रकरणात विशेष न्यायालयाच्या जामीन नाकारण्याच्या निवाड्याला खंडपीठात दिलेली चर्चिलची आव्हान याचिका खंडपीठाने निकालात काढली. ज्या समान न्यायाच्या तत्त्वावर चर्चिलचे वकील अशोक मुंदरगी यांनी भर देऊन ही याचिका सादर केली होती, तो मुद्दा चर्चिल यांना लागू होत नसल्याचे आदेशात म्हटले आहे. माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्यावर आणि चर्चिलवर आरोपही समान आहेत. दोघांच्या विरुद्ध पोलिसांनी गोळा केलेले पुरावेही समान आहेत. त्यामुळे समान न्याय प्रणालीला अनुसरून कामत यांना जसा अटकपूर्व जामीन मंजूर केला तसा कामत यांनाही करावा, अशी मागणी आव्हान याचिकेत केली होती. चर्चिल यांना जामीन नाकारताना न्यायमूर्ती के. एल. वढाणे यांनी साक्षीदारांकडून नोंदविलेल्या पणजी प्रथमवर्ग न्यायाधीशांपुढील कबुली जबाबाची दखल घेतली. जैका प्रकल्पाच्या कामावर थेट नियंत्रणासाठी चर्चिल यांची सुनियोजित खेळी दिसून येत असल्याचे आदेशात म्हटले आहे. (प्रतिनिधी)