गुन्हेगारी मुक्त गोमंतक करण्यासाठी पोलिसांबरोबर नागरिकांनीसुद्धा जबाबदारी स्वीकारावी - मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांचं आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2023 08:10 PM2023-06-08T20:10:12+5:302023-06-08T20:10:58+5:30
Pramod Sawant: गुन्हेगारी लोकांवर वचक ठेवायची असल्यास फक्त पोलीसांनी आपली जबाबदारी निभावली म्हणून होणार नाही,तर एक नागरिक म्हणून सुद्धा प्रत्येक गोमंतकीयानी आपली जबाबदारी पेलायला हवी.
फोंडा- गुन्हेगारीमुक्त गोमंतक हे आमच्या सरकारचे स्वप्न असून त्या संदर्भात पोलीस यंत्रणेला सर्व ते सहकार्य व अधिकार देण्यात आले आहेत. गुन्हेगारी लोकांवर वचक ठेवायची असल्यास फक्त पोलीसांनी आपली जबाबदारी निभावली म्हणून होणार नाही,तर एक नागरिक म्हणून सुद्धा प्रत्येक गोमंतकीयानी आपली जबाबदारी पेलायला हवी. तुम्ही पोलिसांना सहकार्य करा पोलीस तुम्हाला सहकार्य करतील. असे उद्गार मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांनी काढले.
मार्दोळ येथे नवीन पोलीस स्थानकाचे उद्घाटन गुरुवारी त्यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर क्रीडामंत्री गोविंद गावडे, पोलीस महासंचालक जसपाल सिंग, पोलीस महानिरीक्षक ओमवीर सिंह बिष्णोई, उपस्थित होते.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री पुढे म्हणाले की 'गोव्यातील गुन्हेगारी कमी होत आहे. त्याच बरोबर झालेल्या गुन्ह्यांच्या तपास पातळीत व गुन्हेगारांना शिक्षा होण्याच्या प्रमाणात सुद्धा गोव्याच्या पाचवा क्रमांक आहे. आम्हाला ह्यात अजून प्रगती करायची आहे. या दिवसात जी काही प्रकरणे पघडली आहेत त्यामध्ये इतर भागातून आलेल्या लोकांनी गुन्हेगारांचे नाव प्रकर्षाने येत आहे.ह्यावर आळाबंद घालण्यासाठी लोकांनी आपली घरे किंवा सदनिका भाडेपट्टीवर देताना भाडेकरूंची संपूर्ण माहिती मिळवावी. त्यांचे कागदपत्रे पोलिसांकडे सुपूर्द करावी. अन्यथा आपल्या राज्यात चोरी करून किंवा गुन्हे करून लोक इथे येतील आणि निवांतपणे राहतील. एक दिवस हेच गुन्हेगार मग घर मालकाच्या घरात सुद्धा चोरी किंवा इतर गुन्हे करू शकतात .तेव्हा प्रत्येकाने सजग राहणे गरजेचे आहे. गुन्हेगारी जगतात मूळ गोमंतकीयांची नावे क्वचितच येतात हे सुद्धा लक्षात घेण्यासारखे आहे.
आज गोव्याचे पोलीस सुद्धा गुन्हेगारी संदर्भात जागृता निर्माण व्हावी म्हणून वेगवेगळे कार्यक्रम राबवत आहेत. ही चांगली गोष्ट आहे. गुन्हे घडूच नये म्हणून काय करता येईल ह्या गोष्टीवर या कार्यक्रमांमध्ये भर देण्यात येत आहे.
सायबर विषयक गुन्ह्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे हे सरकारच्या लक्षात आले आहे. गोमंतकीय जनता सायबर विषयक गुन्ह्यात भरडली जाऊ नये म्हणून आम्ही तो विभाग सक्षम केला आहे. त्या विभागाला आधुनिकतेची जोड देण्यात आली असून ,24 तास विभाग सजग कसा राहील याकडे लक्ष देण्यात येत आहे. लोकांनी सुद्धा आमिषाना बळी न पडता सद्विवेक बुद्धी वापरावी. ऑनलाईन पध्दतीने पैसे हडप करणारे लोक वेगवेगळे हातखंडे वापरत आहेत तेव्हा लोकांनी ह्या बाबतीत सजत राहावे.