पर्यावरण मंत्र्याचे नागरिकत्व रद्द करावे; माजी मंत्री पाशेको यांची मागणी
By वासुदेव.पागी | Published: December 27, 2023 03:58 PM2023-12-27T15:58:17+5:302023-12-27T15:58:56+5:30
पर्यावरण मंत्री आलेक्स सिक्वेरा यांचा भारतीय पासपोर्ट पंधरा दिवसांत रद्द करण्यात यावा अशी मागणी माजी मंत्री मिकी पाशेको यांनी पासपोर्ट अधिकाऱ्याकडे केली आहे.
वासुदेव पागी, पणजी: पर्यावरण मंत्री आलेक्स सिक्वेरा यांचा भारतीय पासपोर्ट पंधरा दिवसांत रद्द करण्यात यावा अशी मागणी माजी मंत्री मिकी पाशेको यांनी पासपोर्ट अधिकाऱ्याकडे केली आहे. अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशाराही त्यांनी दिला आहे.
पाशेको यांनी पासपोर्ट अधिकार्यांना पत्र लिहिले असून, सिक्वेरांचे नागरिकत्व रद्द केले नाही तर 15 दिवसांत पुढील निर्णय घेणार असल्याचे म्हटले आहे. आझाद मैदानात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.
मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या मंत्रिमंडळात नव्याने मंत्री झालेले आलेक्स सिक्वेरा यांच्या भारतीय पासपोर्टचा मुद्दा मिकी पाशेको यांनी पुन्हा उपस्थित केला आहे. सिक्वेरांचा केनियात जन्म झाला असल्याचा आणि त्यांनी पोर्तुगालमध्ये जन्माची नोंद करण्यात आल्याचा दावा पशेको यांनी पुन्हा एकदा केला आहे.
पशेको म्हणाले की कायदा सर्वांना समान आहे. त्यामुळे विदेशी पासपोर्टमुळे, भारतीय नागरिकत्व गमावलेल्या इतर लोकाप्रमाणेच सिक्वेरा यांचेही भारतीय नागरिकत्व रद्द करण्यात यावे असे त्यांनी म्हटले आहे.