शिरोडा पंचायतीच्या ग्रामसभेत राडा; महिलेला मारहाणीचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2024 08:27 AM2024-01-08T08:27:50+5:302024-01-08T08:28:40+5:30
आरजी ग्रामपंचायतीकडून परस्पविरोधी तक्रारी
लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा : शिरोडा पंचायतच्या ग्रामसभेत रविवारी चांगलाच राडा झाला. व्हिडीओ रेकॉर्डिंगच्या विषयावरून प्रकरण अक्षरश: हातघाईवर गेले. ग्रामसभेत महिलेला अर्वाच्य भाषा वापरत खुर्ची फेकून मारल्याचा आरोप करत आरजी पक्ष आक्रमक झाला.
याप्रकरणी पंच सदस्य मेघनाथ शिरोडकर यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी पक्षाने फोंडा पोलिस स्थानकात केली. तर ग्रामसभेत गदारोळ माजवून, ध्वनी यंत्रणा मोडून टाकून ग्रामपंचायतीचे २५,००० रुपयांचे नुकसान केल्याची तक्रार ग्रामपंचायतीने संबंधीत महिलेविरुद्ध केली.
उपलब्ध माहितीनुसार, पंचायतची ग्रामसभा चालू असताना आरजीच्या कार्यकर्त्यांनी व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू केले. या रेकॉर्डिंगला पंच मेघनाथ शिरोडकर यांनी आक्षेप घेतला. त्यावरून वाद सुरू झाला. परिणमी ग्रामसभेला युद्धाचे स्वरूप आले. ज्या महिलेला अटकाव केला ती पंच शिरोडकर यांच्या अंगावर धावून गेली. यावेळी इतर पंचांनी तिला अडवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सभेत या महिलेवर अत्याचार झाल्याचा आरोप करत आरजीच्या कार्यकर्त्यांनी फोंडा पोलिस ठाणे गाठले. यावेळी आमदार वीरेश बोरकर उपस्थित होते.
तक्रार दाखल केल्यावर पत्रकारांशी बोलताना आरजीचे विश्वेश नाईक म्हणाले, 'एका महिलेवर अत्याचार होत असताना पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली. एका महिलेवर सभेत हल्ला झाला यावर भाजप महिला मोर्चाने आपली भूमिका स्पष्ट करावी.'
दरम्यान, ज्या महिलेवर ग्रामसभेत मारहाण झाली, तिने सांगितले की, 'सभेच्या चित्रीकरणासंबंधी सरपंचांनी आक्षेप घेणे आवश्यक होते. मात्र, तिच्या नवऱ्याला हा अधिकार कोणी दिला? सदर व्यक्ती आमदारांचा भाऊ असल्यामुळेच त्यांना हे बळ मिळत आहे. जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत आता गप्प बसणार नाही.'
आमदार वीरेश बोरकर म्हणाले की, 'भाजप सरकारचे आमदार व त्यांचे कुटुंबीय लोकशाही पायदळी तुडवण्याचे काम करत आहेत. ग्रामसभेत विषय मांडणे व चित्रीकरण करू नये असा कुठेच कायदा नाही. असे असतानाही महिलेच्या अंगावर धावून जाणे कितपत योग्य आहे. पंचायतमंत्र्यानी या घटनेची दखल घेत चौकशी करावी. भाजपच्या प्रत्येक ग्रामपंचायतीत हुकूमशाही चालू आहे.' ग्रामसभेला उपस्थित ग्रामस्थ उमेश नाईक म्हणाले की, 'पंच मेघनाथ शिरोडकर यांनी त्या महिलेला रेकॉर्डिंग न करण्यासंबंधी सूचना केली होती. मात्र ती महिला सूचना न जुमानता समोर उभे राहून रेकॉर्डिंग करू लागली. शिरोडकर यांनी अशोभनीय वर्तन केलेले नाही.'
सरपंच म्हणतात...
दरम्यान, सरपंच पल्लवी शिरोडकर म्हणाल्या की, 'ग्रामसभेत आम्ही अधिकृत चित्रीकरण केले, तरीही आरजीच्या लोकांनी कॅमेरे घेवून बेकायदेशीर चित्रीकरण सुरू केले. रेकॉर्डिंग का असे विचारल्यावर ती महिला प्रक्षुब्ध झाली. पंचांच्या अंगावर धावून गेली. टेबलवरील पाण्याच्या बॉटल्स तिने फेकून मारल्या. लोकांवर चप्पलही फेकली. टेबलवरचा माईक फेकला. ग्रामसभा उधळून लावण्याचा प्रयत्न केला. मेघशाम शिरोडकर पंच आहेत. त्यांनी रेकॉर्डिंग न करण्यासंबंधी फक्त अटकाव केला होता, पंचायत मंडळाची बैठक घेऊन त्या महिलेवर रितसर कारवाईसंबंधी निर्णय घेऊ.