आता रंगतेय मुंगीचे राजकारण; गोविंद गावडेंचेही सडेतोड उत्तर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2024 08:49 AM2024-06-01T08:49:51+5:302024-06-01T08:52:10+5:30
अन्य मंत्री पाहू लागलेत दोन नेत्यांचा वाद
लोकमत न्यूज नेटवर्क पणजी: सभापती रमेश तवडकर आणि कला संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांच्यातील संघर्षाचे वर्णन आणि कारण विषद करताना गुरूवारी तवडकर यांनी मुंगीचे उदाहरण दिले. त्याला प्रत्युत्तर देताना शुक्रवारी गोविंद गावडे यांनी त्याच मुंगीला 'कष्टकरी मुंगी' असे संबोधणारे तसेच कुणाला तरी आयत्या बिळातला (नागोबा) असे संबोधणारे व्यंगचित्र सोशल मीडियावर टाकले आहे. आता यातील मुंगी कोण आणि नागोबा कोण यावरून दोघांच्या समर्थकांच्या तिखट प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
थोडक्यात, आता मुंगीवरून भांडण रंगले आहे. गावडे यांनी सोशल मीडियावर कार्टून पोस्ट केले आहे. त्यात एक मुंगी आंदोलकाच्या पवित्र्यात दाखविण्यात आली आहे. तसेच पाठीमागून कुणीतरी तिला पैशांचे आमिष दाखवित आहे. परंतु मुंगी म्हणजे स्वतः मंत्री गावडे आहेत, असाही अर्थ घेता येणार नाही, कारण मुंगीच्या हातात 'आमगे गोविंद' (आमचा गोविंद) असे लिहिलेला निदर्शन फलक आहे.
त्यात वारुळाचाही उल्लेख आहे आणि 'आयत्या बिळातलो' म्हणजे नागोबाचाही नाव न लिहिता उल्लेख दिसतो आहे. हे कार्टून २०१७ मधील गोवा विधानसभा निवडणुकीतील असल्याचेही गावडे यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.
दरम्यान तवडकर आणि गावडे यांच्यातील थेट संघर्षाला विराम दिसत असला तरी मुंगी आणि नागोबाच्या उल्लेखाने एकमेकांवरील कुरघोड्या चालूच आहेत.
काय म्हणाले होते तवडकर?
सध्या कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांच्याशी बिघडलेल्या संबंधांविषयी पत्रकारांनी विचारले तेव्हा तवडकर म्हणाले होते की, 'एखादी मुंगीही आपल्याला चिरडणाऱ्या माणसाचा प्रतिकार करून चावा घेते, तिथे मी तर राजकारणी आहे. त्यामुळे प्रतिकार करणारच ना.
सीएम सावंतना निमंत्रण : रमेश तवडकर
उभयतांमधील वाद हा मुख्यमंत्रीच बघून घेणार आहेत असे भाजपकडूनही सांगितले जाते. परंतु मुख्यमंत्री या विषय काही बोलले का? असे तवडकर यांना विचारले असता ते म्हणाले की, 'मुख्यमंत्र्यांना मी शनिवारी काणकोण येथे होणाऱ्या श्रमधाम यात्रेचे निमंत्रण देण्यासाठी फोन केला होता. या
कार्यक्रमासंबंधीच बोलणी झाली आहेत. आणखी कोणत्याही विषयावर बोलणे झालेले नाही.'
मी कोणाच्या हाताखालची कठपुतली नाही : गोविंद गावडे
'मी सोशल मीडियावर, फेसबुकवर टाकलेली पोस्ट हा २०१७ च्या निवडणूक प्रचारावेळीचा एक भाग आहे. ती पोस्ट कोणाला लागेल हे सांगता येणार नाही. पण एक लक्षात घेणे आवश्यक आहे की आमचे अस्तित्व आम्ही स्वतः घडवले आहे. आम्ही त्यावेळी मेहनत घेतली, म्हणून आज आमचे अस्तित्व आहे' असे कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी सांगितले.
'मी कोणाच्या हाताखालची कठपुतली नाही, हे सर्वांनी लक्षात घ्यावे' असे प्रत्युत्तर त्यांनी दिले. गावडे म्हणाले की, 'गेल्या काही दिवसात जे काही घडले, त्याबाबत मला केवळ प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी कॉल केला होता. ते सध्या गोव्यात नाहीत. गोव्यात आल्यावर माझ्याशी ते याबाबत चर्चा करणार आहेत, असे त्यांनी मला सांगितले आहे.'