शिवरायांची अॅलर्जी कशाला? छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय दैवत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2024 01:51 PM2024-02-20T13:51:03+5:302024-02-20T13:53:07+5:30
छत्रपती शिवरायांचा लाखो गोमंतकीयांना अभिमान आहे.
छत्रपती शिवरायांचा लाखो गोमंतकीयांना अभिमान आहे. उर्वरित देशाप्रमाणे गोव्यातही शिवाजी महाराजांची भक्ती वाढतेय, छत्रपती शिवाजी केवळ महाराष्ट्र किंवा मराठा साम्राज्यापुरते मर्यादित नव्हतेच. शिवाजी हे राष्ट्रीय दैवत आहे. ते जागतिक कीर्तीचे योद्धे आणि कुशल प्रशासक होते. रयतेचे राजे होते. त्यांना युगप्रवर्तक म्हटले जाते, हे त्यांच्या मूठभर विरोधकांना सांगावेसे वाटते.
सासष्टी तालुक्यातील सां जुझे दी आरियल भागात काल तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. ज्या छत्रपतींच्या गुणांची व तेजाची पूजा केली जाते, त्याच गोव्यात काही अवघ्याच शक्ती अशा आहेत, ज्यांना छत्रपतींविषयी पूर्ण ज्ञान नाही. ते केवळ हिंदवी स्वराज्याचे संस्थापक नव्हते, तर अखिल मानवजातीच्या कल्याणाचा विचार त्यांच्याकडे होता. ते सर्व धर्माना समान न्याय देत असत. त्यांच्या सैनिकांमध्ये मुस्लीम बांधवही होते.
छत्रपती शिवाजीविषयी ज्यांचे वाचन नाही, ज्ञान नाही असे काही घटक पूर्वीपासून ख्रिस्ती समाज बांधवांचा बुद्धिभेद व दिशाभूल करत आले आहेत. शिवाजी म्हणजे महाराष्ट्र एवढेच समीकरण काही ख्रिस्ती बांधवांसमोर पूर्वीपासून मांडले गेले आहे. अगदी अलीकडेदेखील एका म्हालगड्याने मुलाखतीत शिवाजी महाराजांचा गोव्याशी संबंधच नव्हता, असा दावा केला होता. गोव्यात शिवभक्ती वाढवताना आम्हाला वाद वाढवायचा नाही, मात्र, छत्रपतीविषयी ज्यांनी गैरसमज निर्माण केले आहेत, त्यांनी ते दूर करण्याचे कामही आता करायला हवे. जिजामाता, शहाजीराजे, शिवाजी महाराज, संभाजीराजे यांचा इतिहास खिस्ती बांधवांनाही समजून सांगावा लागेल.
शिवाजी महाराज राष्ट्रवादी होते, देशप्रेमी होते, भारतीय भूमीत त्यांचा जन्म झाला होता व भारताच्या भूमीतच त्यांनी आपले शौर्य गाजविले. पराक्रम केले. त्यांची प्रतिमा एखाद्या वाड्यावर किंवा चौकात उभे राहणे हे अभिमानास्पद आहे, गौरवशाली आहे. त्याला नाक मुरडण्याचे कारण नाही, खिस्ती धर्मीयांच्या लोकवस्तीच्या परिसरातही शिवाजी महाराजांची प्रतिमा उभी केली जात असेल तर आक्षेप घेण्याचे कारण नाही. अर्थात हे काम करताना ग्रामपंचायत किंवा पालिका यांना विश्वासात घ्यावेच लागेल. त्यांच्याकडून परवानगीही घ्यावी लागेल. मोकळ्या जागेत छत्रपतींचा पुतळा उभा करण्यास आक्षेप असण्याचे कारण नाही, फक्त कायदेशीर सोपस्कार पार पाडावे लागतील.
अलीकडे रस्त्यांच्या बाजूने जिकडे तिकडे क्रॉस उभे केले जातात. ते अपघातांनाही कारणीभूत ठरतात काही ठिकाणी घुमट्चादेखील आहेत. पण शिवाजी महाराजांची प्रतिमा किंवा अश्वारूढ पुतळा सुरक्षित ठिकाणी उभा केला जात असेल तर वाद घालण्याचे कारण नाही, जे वाद घालतात त्यांना कायद्याच्याच भाषेत समजवावे लागेल, दक्षिण गोव्यातील सासष्टी तालुका हा गोव्याचाच अविभाज्य भाग आहे. तिथे सां जुझे दी आरियल गावात शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करण्यावर बंदी नाही. एखादे क्षेत्र म्हणजे कुणा ठरावीक लोकांचे खासगी भाट नव्हे. काही तालुक्यांमध्ये साडेचारशे वर्षे पोर्तुगीजांची सत्ता होती. बाटाबाटी झाली. अनेकांचे सक्तीने धर्मातर झाले.
पोर्तुगीजांचे पाय गोव्याच्या भूमीला लागले नसते तर या प्रदेशाची संस्कृती व इतिहास त्याकाळी (म्हणजे ४५० वर्षात) दूषित झालाच नसता. बाटाबाटी झाली नसती तर गोव्यात सर्वत्र एकच संस्कृती अनुभवास आली असती. भारतीय संस्कृती हाच गोव्याचा आत्मा आहे. गोवा मुक्त झाल्यानंतर देशाच्या मुख्य प्रवाहात आपण सामील झालो, काही जणांची मानसिकता अजून बदलत नसेल तर ती बदलावी लागेल. सां जुझे दी आरियलमध्ये जर बेकायदा पुतळा उभा केला गेला असेल तर त्याबाबत पंचायत काय ती भूमिका घेईल. तिथे जमावाचे काम नाही, आपल्या परिसरातील किती बेकायदा बांधकामांविषयी लोक जागृत असतात?
कोमुनिदाद जमिनीतील बेकायदा बांधकामे हटवण्याचा आदेश शेवटी न्यायालयांना द्यावा लागतो. छत्रपती शिवाजी महाराज फक्त ५० वर्षे जगले. नशिबाने थोडी साथ दिली असती तर गोवा पोर्तुगीजांच्या तावडीतून मुक्त करण्याचे काम शिवाजी महाराज व संभाजीराजेंनीच करून टाकले असते आणि तसे घडले असते तर आज केवळ पुतळे नव्हे तर गोव्यात अनेक ठिकाणी छत्रपतींची मंदिरे उभी करावी लागली असती.