क्रीडा कर्मचाऱ्यांची कांपाल येथे निदर्शने
By admin | Published: March 11, 2015 03:13 AM2015-03-11T03:13:48+5:302015-03-11T03:15:41+5:30
पणजी : क्रीडा खात्यात रोजंदारीवर काम करणाऱ्या १४१ कर्मचाऱ्यांना सेवेतून काढून टाकल्याने कामगारांनी कांपाल येथे क्रीडा खात्यासमोर
पणजी : क्रीडा खात्यात रोजंदारीवर काम करणाऱ्या १४१ कर्मचाऱ्यांना सेवेतून काढून टाकल्याने कामगारांनी कांपाल येथे क्रीडा खात्यासमोर निदर्शने दिली. सेवेतून काढून टाकताना दोन महिन्यांनी पुन्हा सेवेत घेतले जाईल, असे सांगण्यात आले होते. मात्र, सहा महिने उलटूनही सेवेत घेण्याबाबत तयारी दाखवत नसल्याने सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी कामगारांनी केली आहे.
कंत्राटी पद्धती राबवून सरकार कामगारांवर पूर्णपणे अन्याय करत आहे. १ आॅक्टोबर रोजी कर्मचाऱ्यांना सेवेतून मुक्त करण्यात आले होते; पण दोन महिन्यांनी म्हणजे डिसेंबरमध्ये पुन्हा घेतले जाईल, असे आश्वासन क्रीडामंत्री रमेश तवडकर यांनी दिले होते. मात्र, आता सहा महिने उलटून गेले तरी नोकरीवर पुन्हा घेण्याबाबत काहीच आश्वासक शब्द देण्यात येत नसल्याने कर्मचारी रस्त्यावर उतरले आहेत.
सरकारने विविध सरकारी खाती, तसेच मंडळांद्वारे कर्मचाऱ्यांना कंत्राटी सेवेवर घेतले. रोजगार उपलब्ध करून देण्याच्या बढाया मारणाऱ्या सरकारने कंत्राटी तत्त्वावर घेतलेल्या आणि सेवेतून मुक्त केलेल्या कामगारांनाच आधी कामावर कायम करून घ्यावे, असे कामगार नेते अजितसिंग राणे यांनी सांगितले. क्रीडा खात्यातून कंत्राटी तत्त्वावर भरती केलेल्या १४५ कामगारांना आॅक्टोबर २0१४ पासून कामावरून कमी करण्यात आले आहे. कामावरून कमी करताना दोन महिन्यांत पुन्हा भरती करून घेण्यात येईल, असे आश्वासन क्रीडा संचालकांनी कामगारांना दिले होते. मात्र, आता पाच महिने होत आले असले तरी कामगारांना पुन्हा कामावर घेण्यास पुढाकार घेतला जात नाही, असे राणे यांनी सांगितले. सरकारच्या कंत्राटी पद्धतीविरुद्ध आवाज उठविण्यासाठी सर्व कंपनीचे कर्मचारी, सुरक्षा रक्षक इत्यादी कामगार एकत्र येऊन विधानसभेवर मोर्चा नेणार असल्याचेही राणे यांनी सांगितले. १२ मार्च रोजी कर्मचाऱ्यांकडून एक दिवसीय लाक्षणिक धरणे क्रीडा खात्याच्या समोर केले जाईल. या नंतरही कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याबाबत सरकारने प्रतिसाद दिला नाही तर १४ मार्च रोजी शहरात रॅली काढण्यात येईल, असे राणे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)