पीडीएविरोधकांच्या आंदोलनास दिशा देण्याचा पर्यावरणप्रेमी क्लॉड यांचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2018 02:02 PM2018-05-13T14:02:07+5:302018-05-13T14:02:07+5:30
नव्या पीडीएला जनतेचा तीव्र विरोध
पणजी : बेकायदा खनिज खाणींविरुद्ध कायम लढत आलेले आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत जात मुजोर खाण व्यावसायिकांना वठणीवर आणण्यात ऐतिहासिक भूमिका बजावणारे ज्येष्ठ पर्यावरणप्रेमी डॉ. क्लॉड अल्वारीस यांनी आता पीडीएविरोधकांच्या आंदोलनास योग्य अशी दिशा देण्याचा प्रयत्न चालवला आहे. पीडीएविरोधी आंदोलकांना अल्वारीस हे सातत्याने मार्गदर्शन करू लागले आहेत.
पर्रिकर सरकारने ग्रेटर पणजी ही नवी पीडीए स्थापन करताच राज्यात आंदोलन सुरू झाले. बाबूश मोन्सेरात यांच्याकडे या पीडीएचे चेअरमनपद सरकारने सोपवल्यानंतर सांताक्रुझ, सांतआंद्रेसह बार्देश आणि सासष्टी तालुक्यातूनही आंदोलनास धार चढण्यास सुरुवात झाली. लोकांच्या मागणीची दखल घेत आम्ही ग्रेटर पणजी पीडीएमधून सांताक्रुझ, सांतआंद्रेमधील सगळी गावे व बांबोळीचा पठारही वगळतो, अशी घोषणा नगर नियोजन खात्याने केली होती. पण या घोषणोची अंमलबजावणी झाली नाही. अधिकृतरित्या अजून ही गावे किंवा पठार पीडीएतून वगळण्यात आलेले नाहीत. येत्या 16 रोजी राज्य नियोजन मंडळाची बैठक होणार असून त्या बैठकीतून काही निर्णय अपेक्षित आहेत. पीडीएसह काही भागांमध्ये बाह्यविकास आराखड्यांनाही विकास होत आहे. बिल्डरांच्या हितासाठीच हे सगळे केले जात असल्याची भावना तिसवाडी, बार्देश व सासष्टीतील मतदारांमध्ये आहे.
पीडीएविरोधी आंदोलक सध्या रोज पणजीतील आझाद मैदानावर जमतात आणि तिथे ते साखळी उपोषण करतात. त्यांची दखल घेणे सत्ताधारी भाजपानेही टाळले आहे. अशावेळी क्लॉड अल्वारीस यांनी पुढाकार घेत या आंदोलनाला बळ देत आंदोलनास योग्य ती दिशा देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यापूर्वी आंदोलकांच्या सभेत अल्वारीस यांनी भाषण केले होते. आता ते आझाद मैदानावर येऊन छोटया बैठकांमध्ये आंदोलकांना कायद्याच्या दृष्टीकोनातूनही मार्गदर्शन करत आहेत. आंदोलन कसे टप्प्प्याटप्प्याने पुढे न्यायचे असते याची शिकवण अल्वारीस यांनी आंदोलकांना देण्याचा प्रयत्न चालवला आहे.
अल्वारीस यांच्या तोडीचा एकही मार्गदर्शक अजूनपर्यंत पीडीएविरोधी आंदोलकांना मिळाला नव्हता. याच आंदोलकांना घेऊन अल्वारीस यांनी शनिवारी खाण खात्याच्या मुख्यालयावर मोर्चा नेला व मुख्य दरवाजाला टाळे ठोकले. पीडीएविरोधी आंदोलकांनी यावेळी सरकारविरुद्ध व खाण खात्याविरुद्ध जोरदार घोषणा दिल्या. आम्ही जिंकल्याशिवाय गप्प राहणार नाही, आमची गावे आम्हाला वाचवायची आहेत, आम्हाला काँक्रिटची जंगले नकोत तर हिरवागार गोवा सांभाळून ठेवायचा आहे, असे पीडीएविरोधी आंदोलकांनी पत्रकारांना सांगितले.