पणजीची स्वच्छता आणि रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करणार - महापौर उदय मडकईकर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2019 04:41 PM2019-03-15T16:41:02+5:302019-03-15T16:42:25+5:30

महापालिकेचे नवे महापौर उदय मडकईकर यांनी गुरुवारी आपल्या पदाचा ताबा घेतला. मडकईकर यांच्याकडून पणजीवासियांच्या बऱ्याच अपेक्षा आहेत. त्यांच्याशी केलेली ही बातचीत...

To clean Panaji and keep up wages for the workers - Mayor Uday Madkaikar | पणजीची स्वच्छता आणि रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करणार - महापौर उदय मडकईकर

पणजीची स्वच्छता आणि रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करणार - महापौर उदय मडकईकर

Next

पणजी : महापालिकेचे नवे महापौर उदय मडकईकर यांनी गुरुवारी आपल्या पदाचा ताबा घेतला. मडकईकर यांच्याकडून पणजीवासियांच्या बऱ्याच अपेक्षा आहेत. त्यांच्याशी केलेली ही बातचीत...

प्रश्न : अलीकडेच केलेल्या राष्ट्रीय सर्वेक्षणात पणजीचा क्रमांक प्रचंड घसरलेला आहे. तुम्ही शहरात नेमके कोणत्या कामांना प्राधान्य देणार आहात?
उत्तर : स्वच्छतेच्या बाबतीत राजधानी शहराचा क्रमांक ३५६ पर्यंत खाली घसरला ही खरोखरच अत्यंत चिंतेची बाब आहे. असे व्हायला नको होते. त्यामुळे या गोष्टीची  कारणमिमांसा करण्याचा निर्णय घेतला आहे. स्वच्छतेबाबत शहराचे स्थान घसरण्यामागे नेमके कुठे चुकले याचा आढावा घेतला जाईल.  महापालिकेच्या हातून काही चूक घडली की स्मार्ट सिटीच्या बाबतीत चूक झाली, याची कारणे शोधू. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी आमचे प्राधान्य असेल.

प्रश्न : महापालिकेतील रोजंदारीवरील कामगारांच्या गेल्या अनेक वर्षांच्या मागण्यांचे काय करणार आहात?
उत्तर : महापालिकेतील दोनशेहून अधिक रोजंदारीवरील कामगारांना सेवेत कायम करणे याला प्राधान्य असेल. गेली पंधरा ते वीस वर्षे हे कामगार रोजंदारीवर काम करीत आहेत. कोणाही कामगारांवर अन्याय होणार नाह. मात्र प्रत्येकाने प्रामाणिकपणे आपली सेवा बजावावी लागेल.

प्रश्‍न: भाजपाने यावेळी आपला विरोध सकारात्मक राहील आणि कोणत्याही वाईट काम घडू देणार नाही, असे म्हटले आहे त्याबद्दल तुमचे म्हणणे काय?
उत्तर : कोणीही केवळ विरोधासाठी विरोध करु नये. शहराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. माजी महापौर सुरेंद्र फुर्तादो यांनाही मी तेच सांगितले आहे. भाजपाने या निवडणुकीत आपण उमेदवार रिंगणात उतरविणार नसल्याचे आधीच स्पष्ट केले होते. गुरुवारी भाजपाचा एकही नगरसेवक निवडणुकीला फिरकला नाही. बहिष्काराची ही भूमिका योग्य नव्हे.

प्रश्न : मावळते महापौर विठ्ठल चोपडेकर  यांनी महापालिकेच्या बांधकाम समितीवर अध्यक्षपदी राहण्यास नकार दिला, तुमचे म्हणणे काय? 
उत्तर : त्यांची मर्जी, चोपडेकर यांनी नकार दर्शविल्यानंतर बांधकाम समितीच्या अध्यक्षपदी मावळत्या महापौर अस्मिता केरकर यांची नियुक्ती केलेली आहे. महापालिकेच्या सर्व समित्या समर्थपणे काम करतील. स्थायी समितीवर माझ्या अध्यक्षतेखाली राहुल लोटलीकर दिनेश साळगांवकर, शेखर डेगवेकर, दीक्षा माईणकर व निमंत्रित म्हणून उपमहापौर पाश्कोला माश्कारेन्हस आहेत. शुभदा शिरवईकर यांच्या अध्यक्षतेखाली मार्केट समिती नेमण्यात आली आहे.

प्रश्न : महापौरपदापर्यंतच्या आपल्या राजकीय कारकिर्दीबद्दल काय सांगाल?
उत्तर : भाटले, चिंचोळे भागात ३० वर्षांपूर्वी पोस्टर लावून कारकीर्द सुरू केली. नंतर वाड्यावरील मलनिस्सारण वाहिनी फुटून विहिरी दूषित झाल्या, तेव्हा आवाज उठवला आणि लोकांना न्याय मिळवून दिला. गेल्या दहा वर्षांपासून मी महापौरपदासाठी प्रयत्न करीत आहे. गुरुवारी पदाचा महापौरपदाचा ताबा घेतल्यानंतर कष्टाचे चीज झाल्याचे समाधान झाले. अर्थात या गोष्टीला आमचे सर्वेसर्वा बाबूश मोन्सेरात यांचे मोठे सहकार्य लाभले.

प्रश्न : महापालिकेवर आयुक्त स्थानिक अधिकारीच असावा, अशी मागणी तुमचे सर्वेसर्वा बाबूश मोन्सेरात यांनी केली आहे तर भाजपने याला विरोध करताना आयएएस अधिकारीच योग्य असल्याचे म्हटले आहे. तुमचे काय म्हणणे आहे?
उत्तर: बाबूश यांच्या म्हणण्याशी मी ठाम आहे. याचे कारण स्थानिक अधिकारीच आयुक्त म्हणून नेमल्यास तो योग्य प्रकारे लोकांना न्याय देऊ शकेल. आयएएस अधिकारी इंग्रजीतून बोलतात. सर्वसामान्य लोक असतात तेव्हा आयएएस अधिकाऱ्याला काही समजत नाही स्थानिक भाषा अवगत असलेला येथील परिसराची जाण असलेला स्थानिक अधिकारी अधिकारीच आयुक्त हवा.

Web Title: To clean Panaji and keep up wages for the workers - Mayor Uday Madkaikar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा