दुसऱ्या ट्रॅकचा मार्ग मोकळा; सर्व आक्षेप फेटाळले, प्रक्रिया लवकर पूर्ण करण्याचे निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2023 09:02 AM2023-03-20T09:02:33+5:302023-03-20T09:03:15+5:30
कुळे ते वास्को रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणासाठी प्रस्तावित भूसंपादन अधिसूचनेबाबत नागरिकांनी एकूण २६ आक्षेप नोंदवले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : दक्षिण-पश्चिम रेल्वेच्या कुळे ते वास्को रेल्वे मार्ग दुपदरीकरणासाठी लोकांचा विरोध डावलून, पर्यावरणप्रेमींसह इतर जागरूक नागरिकांनी नोंदवलेले आक्षेप फेटाळून लावत भूसंपादन भरपाई नोटीस जारी करण्यात आली आहे. त्यामुळे आगामी काही दिवसांत हे प्रकरण अधिक चिघळण्याची शक्यता आहे. कुडचडे, काकोडा, सावर्डे, सां जुझे द आरियल, चांदर, गिर्दोली, वेळसाव व इसोस या गावांतील एकूण ०.९९८५ हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे.
याबाबत वास्को उपजिल्हाधिकारी आणि उपविभागीय अधिकारी कार्यालयाने हॉस्पेट हुबळी तिनाघाट वास्को-द-गामा दुहेरीकरण या विशेष रेल्वे प्रकल्पासाठी भरपाई जाहीर करणारी सार्वजनिक सूचना जारी केली आहे. हा प्रकल्प रेल्वे विकास निगम लिमिटेडद्वारे कार्यान्वित केला जात आहे. कुळे ते वास्को रेल्वे मार्ग दुपदरीकरणाच्या सार्वजनिक उद्देशासाठी रेल्वे कायदा, १९८९ अंतर्गत भारत सरकारच्या दक्षिण पश्चिम रेल्वेकडून जमीन संपादित करण्याचा हा प्रस्ताव आहे.
अधिसूचनेत नमूद केल्याप्रमाणे भूसंपादन करण्यासाठी जिल्हाधिकारी आणि मुरगावचे उपविभागीय दंडाधिकायांची सक्षम प्राधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जारी केलेल्या नोटिशीत प्रस्तावित विशेष रेल्वे प्रकल्पाच्या अंतर्गत, संरचनेसह किंवा त्याशिवाय संपादित करावयाच्या जमिनीचे संक्षिप्त वर्णन तसेच विविध लोकांना दिलेल्या नुकसानभरपाईची माहिती दिली आहे.
पर्यावरणविषयक आक्षेपांवर सुनावणी
कुळे ते वास्को रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणासाठी प्रस्तावित भूसंपादन अधिसूचनेबाबत नागरिकांनी एकूण २६ आक्षेप नोंदवले होते. यापैकी २० आक्षेप पर्यावरणीय समस्यांशी संबंधित होते. रेल्वे दुपदरीकरणानंतर खनिज वाहतुकीत वाढ होईल आणि पर्यावरणावर त्याचे दुष्परिणाम होणार याकडे लक्ष वेधण्यात आले होते. यापैकी १० आक्षेप पूर्णपणे फेटाळण्यात आले तर उर्वरित १० आक्षेप अधिकारिणीच्या कक्षेत येत नाहीत, असे सांगून सुनावणीनंतर फेटाळण्यात आले, असे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, दक्षिण पश्चिम रेल्वेच्या आकडेवारीनुसार हॉस्पेट- हुबळी- लोंढा - वास्को दुहेरी रेल्वे मार्गांच्या एकूण ३५२.५८ किमीपैकी ७५.१६ टक्के काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पासाठी एकूण ३६९२,६० कोटी रुपये खर्च येणार आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"