किनारी भागातील बांधकामावरील कारवाईच्या निषेधार्थ हणजुणात बंद
By काशिराम म्हांबरे | Published: February 19, 2024 01:35 PM2024-02-19T13:35:07+5:302024-02-19T13:35:22+5:30
आज किंवा उद्या हे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे.
काशिराम म्हांबरे
म्हापसा : हणजूण-कायसूवा पंचायत क्षेत्रात किनाºयावरील विकास प्रतिबंधित क्षेत्रात उभारण्यात आलेली बांधकामे सील करण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. दिलेल्या आदेशानंतर सील करण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या प्रक्रियेचा निशेद व्यक्त करुन विरोध करण्यास ग्रामस्थांनी पुकारलेल्या बंदला अत्यंत चांगला प्रतिसाद लाभला आहे. सुमारे१७५ हून जास्त बांधकामाने सील करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान यावर तोडगा काढण्यासाठी पंचायत क्षेत्रातील १२ व्यावसायिकांच्या शिष्टमंडळा समवेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन तोडग्याची मागणी केली जाणार असल्याची माहिती आमदार मायकल लोबो यांनी दिली. आज किंवा उद्या हे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे.
हणजूण-कायसूवा पंचायत क्षेत्रातील सर्व व्यावसायिकांनी आपले व्यवसाय आज १९ रोजी सकाळपासून बंद ठेवलेहोते. सरकारने व्यावसायिकांच्या संयमाची परीक्षा पाहू नये. विद्यमान नियमात विशेष दुरुस्ती करुन व्यावसायिकांना दिलासा देण्यासाठी पावले उचलण्यात यावी अशी मागणी आंदोलकांनी केली. स्टारको जंक्शनजवळ झालेल्या सभेत कळंगुटचे आमदार मायकल लोबो, डिलायला लोबो, आरजीचे नेते मनोज परब, राजेंद्र घाटेतसेच इतर विविध नेते सहभागी झाले होते. यावेळी बंदात सहभागी झालेल्यांना संबोधीत करताना लोबो म्हणाले, न्यायालय आपले कार्य करीत आहे. त्यामुळे त्यावर भाष्य करणे चुकिचे आहे. अशावेळी आलेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी सरकारशी चर्चा करुन तोडगा काढण्यास पावले उचलणे गरजेचे असल्याचेसांगितले.
बांधकामांना कायदेशीर म्हणून मान्यता देण्यासाठी कुठली कागदपत्रे ग्राह्य धरली जातील यावर सरकारने अधिसुचना जारी करावी असेही लोबो म्हणाले. तसेच तोडग्यासाठी पंचायत क्षेत्रातील शिष्टमंडळा समवेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेणार असल्याची माहिती लोबो यांनी दिली.