मुख्यमंत्र्यांकडून खाते वाटपासाठी शुक्रवारी बैठक; सात मंत्री दिल्लीत दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2018 09:09 PM2018-10-11T21:09:43+5:302018-10-11T21:12:36+5:30
मनोहर पर्रिकर त्यांच्याकडे असणाऱ्या अतिरिक्त खात्यांचं वाटप करणार
पणजी : आपल्याकडील अतिरिक्त खाती मंत्र्यांमध्ये वितरित करण्यासाठी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर हे उद्या शुक्रवारी सात मंत्र्यांसोबत व भाजपच्या काही प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक घेणार आहेत. कुणाला कोणते खाते द्यावे तसेच अधिकारांचे वाटप कसे करावे याविषयी मुख्यमंत्री चर्चा करतील. यासाठी एकूण सात मंत्री गुरूवारी दिल्लीत दाखल झाले आहेत.
मुख्यमंत्र्यांनी खाते वाटपाविषयी अगोदर प्रस्ताव द्यावा, जेणेकरून गोवा फॉरवर्डच्या मंत्र्यांना कोणती खाती मिळतील हे कळेल, असे मंत्री विजय सरदेसाई यांनी अगोदर मुख्यमंत्र्यांना सुचवले होते. पण मुख्यमंत्र्यांनी आज शुक्रवारी सर्वाना थेट चर्चेसाठीच बोलावले आहे. भाजपाचे मंत्री माविन गुदिन्हो, निलेश काब्राल व विश्वजित राणे हे बैठकीत सहभागी होतील. नगर विकास मंत्री मिलिंद नाईक यांना मात्र बोलावलेले नाही. मगोपचे मंत्री सुदिन ढवळीकर व गोवा फॉरवर्डतर्फे मंत्री सरदेसाई सहभागी होतील. पर्यटन मंत्री बाबू आजगावकर हे दिल्लीला जाणार नाहीत. त्यांना बैठकीचे निमंत्रण नाही. शिवाय ते त्यांच्या कौटुंबिक सोहळ्यात व्यस्त आहेत.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर व एक-दोन पदाधिकारी बैठकीत सहभागी होतील. दिल्लीतील एम्स इस्पितळात मुख्यमंत्री उपचार घेत असून तिथेच बैठक होईल. मुख्यमंत्री आपल्याकडील अर्थ व गृह खाती देणार नाहीत, पण अन्य महत्त्वाची खाती देतील. मात्र मनाजोगी खाती मिळाली नाही तर काय होईल, याचे संकेत काही मंत्र्यांसोबत बोलताना मिळतात. वन, पर्यावरण, खाण, सहकार, शिक्षण, उच्च शिक्षण, तांत्रिक शिक्षण, व्यावसायिक शिक्षण, नागरी उड्डाण अशी विविध खाती तसेच गुंतवणूक प्रोत्साहन मंडळ, मोपा प्राधिकरण, कचरा व्यवस्थापन महामंडळ अशा सरकारी संस्थांची चेअरमनपदेही पर्रिकर यांच्याकडेच आहेत. खाते वाटप उद्याच होणार नाही. मंत्र्यांचे म्हणणो ऐकून मुख्यमंत्री मग स्वतंत्रपणे भाजपशी चर्चा करतील. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनाही खात्यांची यादी दाखवली जाईल. त्यानंतर निर्णय होईल, असे सूत्रांनी सांगितले.