सीएमचे आसन भक्कम; विरोधक 'क्लीन बोल्ड'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2024 09:32 AM2024-09-25T09:32:16+5:302024-09-25T09:33:27+5:30
'व्हिडिओगिरी'चा श्रेष्ठींवर परिणाम नाही
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना टार्गेट करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्यात जो वाद निर्माण झाला त्या वादाची दखल भाजपच्या दिल्लीतील नेत्यांनी देखील घेतली आहे. अर्थात नेतृत्वाला घेरण्यासाठी जरी व्हिडीओ काही जणांनी व्हायरल केला, असे गृहित धरले, तरी या वादात मुख्या मुख्यमंत्री सावंत यांचे आसन अधिक घट्ट झाल्याचे गोवा भाजपमध्ये मानले जात आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वतः आपल्या स्पष्टीकरणाचा रविवारी काढलेला व्हिडीओ प्रथमच भाजपच्या अनेक पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते व भाजप आमदारांनी व्हायरल केला व आपण मुख्यमंत्र्यांसोबत ठामपणे आहोत हे दाखवून दिले.
सरकारमधील ज्येष्ठ मंत्री सुभाष शिरोडकर व मंत्री रोहन खंवटे यांनी काल, सोमवारी एकत्र बसून विरोधकांच्या आरोपांना उत्तर दिले. तसेच, सोशल मीडियावरून आलेल्या व्हिडीओबाबतही खंवटे व शिरोडकर यांनी भाष्य केले. लोकांना वाटते की, केवळ दोन नव्हे, तर किमान आठ ते दहा मंत्र्यांना बसवून पत्रकार परिषद घ्यायला हवी होती. तसेच, भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे आदी नेत्यांना पत्रकार परिषदेस बोलावून व्हिडीओमधील आरोपांचे खंडन करता आले असते. अर्थात तसे केले गेले नाही, तरी देखील मंत्री शिरोडकर व खंवटे यांनी मुख्यमंत्र्यांची बाजू खूप प्रभावीपणे मांडली. सोशल मीडियातून व्हिडीओ जारी करून सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न काही विरोधक व असंतुष्ट आत्मे करतात, असे खंवटे व इतरांना वाटते.
आपल्याला टार्गेट करण्याचा प्रयत्न काहीजण करतात, असे मुख्यमंत्र्यांनी दिल्लीत पक्षश्रेष्ठींना कळवले आहे, अशी माहिती राजकीय सूत्रांकडून मिळते. अर्थात मुख्यमंत्र्यांना भाजप हायकमांडने चिंता करण्याचे कारण नाही, असे सांगितल्याचीही माहिती प्राप्त होत आहे. सरकारमध्ये नेतृत्व बदल होणार नाही याची कल्पना भाजप कोअर टीमला आलेली आहे, अशी माहिती पक्ष सूत्रांकडून 'लोकमत'ला मिळाली.
मुख्यमंत्र्यांनी व्हिडीओ जारी करून उत्तर दिल्यानंतर भाजपच्या सर्व आमदारांनी व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या स्पष्टीकरणाचा व्हिडीओ व्हायरल करत तो सर्वांपर्यंत पोहचवला. मंत्रिमंडळातील स्पर्धा व मंत्रिमंडळातील वाद देखील या व्हिडीओच्या आरोप-प्रत्यारोपातून लोकांमध्ये चर्चेत आले. व्हिडीओचा झालेला सुळसुळाट म्हणजे सत्तेसाठीची स्पर्धा आहे, असे लोकांमध्ये मानले जात आहे.
विरोधकांनी व्हिडीओ काढला, म्हणून त्या व्हिडीओचा भाजप सरकारच्या स्थिरतेवर काहीच परिणाम होणार नाही. मुख्यमंत्री सावंत यांच्या नेतृत्वाखाली सरकार मजबूत आहे व मजबूत राहील. व्हिडीओतील विषयांवर यापूर्वी विधानसभेत चर्चा झाली असून, त्यात नवे काही नाही. - सदानंद तानावडे, प्रदेशाध्यक्ष.