जीवन, आरोग्य विमासंबंधी जीएसटी मंत्रिगटावर मुख्यमंत्री प्रमोद सावंत नियुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2024 11:27 AM2024-09-17T11:27:53+5:302024-09-17T11:28:31+5:30
नवी दिल्लीत झालेल्या ५४ व्या जीएसटी मंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : आरोग्य व जीवन विमा संदर्भात केंद्र सरकारने स्थापन केलेल्या १३ सदस्यीय मंत्र्यांच्या गटात गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची सदस्य म्हणून निवड केली आहे.
नवी दिल्लीत ९ सप्टेंबर रोजी झालेल्या ५४ व्या जीएसटी मंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला आहे. या बैठकीत आरोग्य व जीवन विमा या महत्वाच्या विषयावर चर्चा झाली. सदर मंत्र्यांचा गट हा आरोग्य व जीवन विमाच्या यशस्वी अंमलबजावणी, आरोग्य व जीवन विमा संदर्भातील जीएसटी प्रीमियम, त्यावर करांच्या टक्केवारीचे पुनरावलोकन करणे यावर काम करुन त्याचा अहवाल ३० ऑक्टोबरपर्यंत केंद्राला सादर करेल.
बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी हे या मंत्रिगटाचे समन्वयक आहेत. गोव्याच्या मुख्यमंत्र्यांसह सुरेश कुमार खन्ना, गजेंद्र सिंग, चंद्रीमा भट्टाचार्य, कृष्णा बायरे गौडा, के. एन. बालागोपाल, पय्यवुला केशव, कनुभाई देसाई, कोनार्ड संगमा, हरपाल सिंग चिमा, थंगम थेनसरू, मल्लू भट्टी विक्रमर्का या गटाचे सदस्य आहेत.