कर्नाटकच्या पोटात का दुखते, कळत नाही; म्हादई प्रकरणी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा सवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2024 09:51 AM2024-07-10T09:51:15+5:302024-07-10T09:51:43+5:30
गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आमदार विजय सरदेसाई यांनी सावंत सरकार म्हादईबाबत गंभीर नसल्याचा आरोप केला.
लोकमत न्यूज नेटर्वक पणजी : म्हादईच्या निरीक्षणासाठी प्रवाह प्राधिकरणाला खरे तर सर्वांनी सहकार्य करायला हवे. परंतु, कर्नाटकच्या पोटात का दुखते, हे कळत नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी कर्नाटकात लोकांनी त्यांची प्रतिमा जाळली, त्यावर प्रतिक्रिया दिली.
मुख्यमंत्री म्हणाले की, म्हादईच्या बाबतीत गोवा योग्य मार्गाने पुढे जात आहे. म्हादईची तपासणी मुक्त वातावरणात होणे अपेक्षित होते, गडबड व गोंधळ घालून नव्हे. केंद्र सरकारने नेमलेल्या प्रवाह प्राधिकरणाने आपले काम करू द्या. गोव्याची बाजू भक्कम आहे. पाहणीचा अहवाल हे प्राधिकरण केंद्राला पाठवणार आहे. बेळगाव येथे कर्नाटक रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी बेळगाव येथे कदंब बस अडवून निदर्शने केली. कळसा-भांडुरा प्रकल्पाला गोवा सरकार विरोध करीत असल्याच्या पार्श्वभूमीवर ही निदर्शने होती. दुसरीकडे 'प्रवाह' प्राधिकरणाची दुसरी बैठक बंगळुरू येथे झाली.
त्यांचे तीस अन् आमचे तीन अधिकारी
गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आमदार विजय सरदेसाई यांनी सावंत सरकार म्हादईबाबत गंभीर नसल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, प्रवाह प्राधिकरणाचे अधिकारी म्हादईच्या तपासणीसाठी आले तेव्हा गोव्याने फक्त तीनच अधिकारी पाठवले, तर कर्नाटकने तब्बल ३० अधिकाऱ्यांचा ताफा पाठवला. कर्नाटकच्या या ताफ्यासमोर गोव्याचे फक्त तीन अधिकारी काय बचाव करणार?