मुख्यमंत्र्यांनी विविध मागण्यांकडे वेधले केंद्रीय मंत्र्यांचे लक्ष; ऑनलाईन गेमिंगवरही करणार चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2024 12:34 PM2024-06-23T12:34:20+5:302024-06-23T12:35:30+5:30
या बैठकीत मुख्यमंत्री गोव्यासाठी महत्त्वपूर्ण योजनांची मागणी करणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय रेल्वेमंत्री आणि माहिती प्रसारण आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. मुख्यमंत्री जीएसटी मंडळाच्या बैठकीत भाग घेण्यासाठी दिल्लीला गेले आहेत. या बैठकीत मुख्यमंत्री गोव्यासाठी महत्त्वपूर्ण योजनांची मागणी करणार आहेत.
केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या भेटीतही त्यांनी गोव्यासाठी काही महत्त्वपूर्ण मागण्या केल्या आहेत, असे वृत्त आहे. मात्र, अश्विनी वैष्णव यांना शुभेच्छा देण्यासाठी ही भेट घेतली होती, असे त्यांनी आपल्या 'एक्स' वरील पोस्टमध्ये म्हटले आहे. याच दौऱ्यात मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय जड उद्योगमंत्री कुमारस्वामी यांचीही भेट घेतली आहे.
ऑनलाईन गेमिंगवरही करणार चर्चा
दरम्यान, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या जीएसटी मंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री गोव्यातील काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत. ऑनलाईन गेमिंगवर लागू करण्यात आलेला २८ टक्के कर कमी करण्याच्या कॅसिनोंच्या मागणी संबंधी मुख्यमंत्री काही बोलतील की बोलणार नाहीत, याबद्दलही कुतूहल निर्माण झाले आहे.