४१ जणींचा सुगावा लागेना, २१७ महिलांचा शोध; मुख्यमंत्र्यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2023 08:04 PM2023-07-27T20:04:45+5:302023-07-27T20:05:21+5:30
राज्यात २०१८ ते २०२२ या पाच वर्षांत एकूण २५८ महिला अपहरणाच्या तक्रारी पोलिस स्थानकात नोंद झाल्या होत्या.
नारायण गावस: पणजी : गोव्यात गेल्या पाच वर्षांत एकूण २५८ महिलांचे अपहरण झाले आहे. गाेवा पोलिसांना यातील २१७ जणांचा शाेध लावण्यात यश मिळाले आहे. तर, ४१ जणांचा अजून शोध लागलेला नाही, अशी माहिती गोवा विधानसभेत मुख्यंमत्री डॉ.प्रमोद सावंत यांनी गृहमंत्री या नात्याने लेखी स्वरूपात मांडली आहे.
राज्यात २०१८ ते २०२२ या पाच वर्षांत एकूण २५८ महिला अपहरणाच्या तक्रारी पोलिस स्थानकात नोंद झाल्या होत्या. यातील २१७ जणांना शोधून काढण्यात गाेवा पोलिस यशस्वी झाले, तर ४१ अजूनही बेपत्ता आहेत. गोवा हे सुशिक्षित राज्य मानले जात असले तरी महिलांच्या अपहरणांचे प्रमाण मात्र कमी झालेले नाही. अपहरणांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी एकट्या महिलेला बाहेर फिरणेही कठीण झाले आहे.
एका बाजूने सरकारतर्फे महिला सुरक्षित असल्याचे सांगितले जाते. पण, दुसरीकडे महिला अपहरणाचे प्रमाण मोठे आहे.
गोव्यात मोठ्या प्रमाणात परराज्यातील कामगार येत आहेत. हे कामगार मुलींना अगोदर प्रेमाचे आमिष दाखवतात जर त्या तयार झाल्या नाही तर त्यांचे अपहरण केले जात असल्याच्याही घटना घडल्या आहेत. काही महिलांचे अपहरण करून त्यांना परराज्यात नेण्यात आले आहे. यात अल्पवयीन मुलींची संख्या जास्त आहे. यातील अनेक जणांना शोधून काढण्यात पाेलिसांना यश आले आहे.
मागील पाच वर्षांची आकडेवारी
वर्ष - गुन्हा नोंद - शोध लावण्यात यश
२०१८ - ७९ - ६४
२०१९- ५०- ३९
२०२०- ३१- २६
२०२१- ३९- ३३
२०२२- ५९- ५५