मुख्यमंत्र्यांनी घेतली नड्डा यांची भेट; कदंब पठारावरील भाजप भवनच्या पायाभरणीसाठी निमंत्रण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2024 12:42 PM2024-07-03T12:42:20+5:302024-07-03T12:43:41+5:30
पुढील पंधरा दिवसात पायाभरणी होण्याची शक्यता आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री तथा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची दिल्लीत भेट घेऊन कदंब पठारावर येऊ घातलेल्या भाजप भवनच्या पायाभरणीसाठी त्यांना निमंत्रण दिले. पुढील पंधरा दिवसात पायाभरणी होण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्र्यांसोबत प्रदेशाध्यक्ष तथा राज्यसभा खासदार सदानंद तानावडे उपस्थित होते. पक्ष संघटनेच्या बाबतीतही यावेळी चर्चा झाली. कदंब पठारावर भाजपचे भव्य कार्यालय येणार आहे. ६०० आसन क्षमतेचा हॉल व इतर व्यवस्था या इमारतीत असणार आहे. आधुनिक सुविधांनी सुसज्ज असे भवन येणार असून यात प्रदेशाध्यक्षांसाठी केबिन, हॉल, कॅन्टीन व रात्री निवासाचीही व्यवस्था असणार आहे.
गुजरात तसेच अलीकडेच रायपूर, छत्तीसगडमध्ये भाजपने उभारलेल्या अद्ययावत व सुसज्ज कार्यालयाच्या धर्तीवर हे कार्यालय असेल. त्यासाठी कदंब पठारावर २९०० चौरस मीटर जागा संपादित केली आहे. प्रदेशाध्यक्ष, सरचिटणीस यांच्यासाठी स्वतंत्र दालने, मोठा कॉन्फरन्स हॉल, कार्यकर्त्यांच्या बैठका घेण्यासाठी सभागृह, व्हर्चुअल मीटिंग करण्यासाठी सुसज्ज यंत्रणा या नवीन भाजप भवनमध्ये असेल. हे भवन शहराबाहेर येत असल्याने कॅन्टीन व्यवस्था आणि केंद्रातून येणाऱ्या नेत्यांची निवास व्यवस्था, अशी सज्जता येथे असणार आहे.
काब्रालही दिल्लीत!
आमदार निलेश काब्राल हेही दिल्लीत तळ ठोकून आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला ऊत आला. परंतु 'लोकमत'च्या या प्रतिनिधीने काब्राल यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, मी माझ्या वैयक्तिक कामासाठी दिल्लीत आहे. कोणीही मला बोलावलेले नाही. दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच आरोग्यमंत्री विश्वजीत राणे हेही दिल्लीला जाऊन आले. त्यामुळे चर्चा रंगली आहे.