मुख्यमंत्र्यांचे 'मिशन दक्षिण'; ८ ठिकाणी विविध कार्यक्रम, गाठीभेटी घेणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2024 11:46 AM2024-03-13T11:46:10+5:302024-03-13T11:46:48+5:30
दक्षिण गोवा मतदारसंघ यावेळी काबीज करायचाच या ध्येयाने भाजपच्या प्रत्येक नेत्याने कंबर कसली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी 'मिशन दक्षिण गोवा' हाती घेतले असून आज, बुधवारी ते संपूर्ण दिवस दक्षिणेत आठ ठिकाणी 'विकसित भारत', 'मोदी की गॅरेंटी' व 'संकल्प पत्र अभियन' कार्यक्रमांच्या निमित्ताने लोकांच्या गाठीभेटी घेतील.
महिला उमेदवाराबाबत पेच निर्माण झाल्याने दक्षिण गोव्यात भाजप अजून उमेदवार देऊ शकलेला नाही. परंतु पक्षाने जनसंपर्कासाठी विविध कार्यक्रम मात्र चालूच ठेवले आहेत. उमेदवार कोणीही असो, दक्षिण गोवा मतदारसंघ यावेळी काबीज करायचाच या ध्येयाने भाजपच्या प्रत्येक नेत्याने कंबर कसली आहे.
दिवंगत मनोहर पर्रीकर हे मुख्यमंत्री असताना त्यांनी दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघ काबीज करण्यासाठी 'मिशन सासष्टी' राबवले होते. प्रत्येक खिस्ती मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न त्यावेळी पर्रीकर यांनी केला होता.
प्रमोद सावंत यांनी 'दक्षिण गोवा' मिशन आखले आहे. आज, बुधवारी सकाळपासून रात्री ८ वाजेपर्यंत त्यांचे कार्यक्रम ठरलेले आहेत.
फोंड्यात देवदर्शनाने होणार सुरुवात
मुख्यमंत्र्यांचा दक्षिण दौरा आज, बुधवारी सकाळी ९.१५ वाजता अपर बाजार-फोंडा येथील विठोबा मंदिरातील देवदर्शनाने सुरु होईल. ९.३० वाजता पीईएस फार्मसी कॉलेजसमोर नमो नवमतदार संमेलनात ते मार्गदर्शन करतील. त्यानंतर १०.३० वाजता फोंड्यातच रुक्मिणी हॉलमध्ये मार्केटमधील विक्रेते, व्यापार, बिझनेस फोरम व कामगारांशी ते संवाद साधतील. दुपारी १२ वाजता कसई- दाभाळ येथे सातेरी मंदिरात लाभार्थी संमेलनात संबोधतील. त्यानंतर दुपारी ३.३० वाजता कुडचडे येथे रवींद्र भवनमध्ये व्यापारी संमेलनात ते संवाद साधतील.
व्यावसायिकांची बैठक
मुख्यमंत्री सायं. ५ वाजता मुख्यमंत्री सांगे येथे पालिका सभागृहात क्रीडापटूंशी संवाद साधणार आहेत. सायंकाळी ६.३० वाजता कुडतरी येथे कोरडे इलेक्ट्रिकल शोरुमजवळ विकसित भारत, मोदी की गॅरेंटी सत्कार समारंभात ते सहभागी होतील. रात्री ८ वाजता मडगाव येथे नानुटेल हॉटेलमध्ये व्यावसायिकांची बैठक मुख्यमंत्री घेणार आहेत.
उमेदवार जाहीर न झाल्याने तिकिटाच्या विषयावरुन थोडी चलबिचल होती. परंतु, मुख्यमंत्र्यांच्या धडाकेबाज दौऱ्यामुळे आता कार्यकर्त्यां मध्येही उत्साहाचे व चैतन्याचे वातावरण निर्माण झालेले आहे. आमदार, मंत्रीही सक्रीय बनले आहेत.
बाबू कवळेकरनी दिल्लीत नेत्यांच्या घेतल्या गाठीभेटी
तिकिटाचा तिढा अजून सुटलेला नाही. मिळालेल्या माहितीनुसार, तिकिटोच्छुक माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळकर हे गेले तीन दिवस दिल्लीत होते. तेथे त्यांनी काही भाजप नेत्यांच्या गाठीभेटीही घेतल्या. उमेदवारी आपल्याला मिळेल याबाबत ते आशावादी आहेत. मात्र अजून तिकिटाबद्दल तशी स्पष्टता नाही.
काब्रालांच्या नावाचीही चर्चा!
दक्षिणेत भाजपचा उमेदवार कोण याबद्दल उत्कंठा असतानाच आमदार निलेश काब्राल यांच्या नावाची चर्चाही सुरु झालेली आहे. काब्राल यांना केंद्रीय नेत्यांच्या आदेशावरुन मंत्रिपद सोडावे लागले होते. त्यांच्या जागी काँग्रेसचे फुटीर आमदार आलेक्स सिक्चेरा यांचा मंत्रिमंडळात समावेश केला होता. काब्राल यांना मंत्रिपद सोडावे लागल्याने त्यांना दिल्लीत नेऊन पुनर्वसन करण्याच्या हेतूने लोकसभेची उमेदवारी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, 'लोकमत'ने काब्राल यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, माझ्याकडे तरी याबद्दल कोणी काही बोललेले नाही. तुम्ही मुख्यमंत्री किंवा प्रदेशाध्यक्षांना विचारा.
काँग्रेसचे उमेदवारही ठरेनात
काँग्रेसने दिल्लीत ४३ उमेदवारांची दुसरी यादी काल जाहीर केली. परंतु या यादीत गोव्याच्या दोनपैकी एकाही जागेवर उमेदवार दिलेला नाही, त्यामुळे उमेदवार कोण याबाबत गूढ कायम आहे. गोव्यात पाच विरोधी पक्षांच्या 'इंडिया' युतीसाठी काँग्रेस आपला उमेदवार देणार आहे. मात्र दक्षिण गोव्यात गोवा फॉरवर्डने विद्यमान खासदार फ्रान्सिस सार्दिन यांच्या नावाला विरोध केला आहे. त्यामुळे काँग्रेससमोर पेच निर्माण झाला आहे. उत्तर गोव्यात माजी केंद्रीय कायदामंत्री अॅड. रमाकांत खलप व विजय भिके अशी दोन नावे असली तरी आता सुनील कवठणकर यांचेही नाव पुढे येत आहे.