“गोवा ही देवभूमी आहे, आध्यात्मिक पर्यटन बहरणार”: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2023 02:47 PM2023-02-20T14:47:50+5:302023-02-20T14:48:16+5:30
'मातृभूमी' पुरस्काराने आचार्य बाळकृष्ण यांचा गौरव
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी :गोवा ही देवभूमी आहे. तिची प्रतिमा सन, सॅण्ड आणि सी असे होती. आता यामध्ये बदल होऊन सन, सॅण्ड, सी, स्पिरीच्यूअल आणि सॉफ्टवेअर असे होत चालले आहे. राज्य कुठल्याही क्षेत्रात मागे राहिलेले नाही. अध्यात्मदेखील आता राज्याशी जोडले जात आहे, हे खूप समाधानकारक आहे. यातून आध्यात्मिक पर्यटनदेखील राज्यात बहरणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
पणजीतील आझाद मैदान येथे रविवारी आयोजित केलेल्या लोकमान्य संस्थेच्या मातृभूमी पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना मुख्यमंत्री सावंत बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत योगगुरु रामदेव बाब, पतंजलीचे संस्थापक सत्कारमूर्ती आचार्य बाळकृष्ण, ब्रह्मेशानंद स्वामी केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, आमदार प्रवीण आर्लेकर, माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप, लोकमान्य
संस्थेचे संस्थापक किरण ठाकूर उपस्थित होते.
आयुर्वेद ऋषी मुनींची देणगी आहे. वारसा पुढे नेण्याचे काम योगगुरू रामदेव बाबा आणि बाळकृष्ण महाराज पतंजली संस्थेच्या माध्यमातून पुढे करत आहेत. काही वर्षात आचार्य बाळकृष्ण यांचाही ग्रंथ आयुर्वेदासाठी उपयोगात येईल, याची खात्री आहे, असे सावंत यांनी यावेळी सांगितले.
मान्यवरांच्या हस्ते आचार्य बाळकृष्ण यांना 'मातृभूमी' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. १० लाख रुपये, मानचिन्ह, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
सव्वा लाख पानांचा ग्रंथ
आयुर्वेद हे ऋषीमुनींच्या तपस्या, ज्ञानातून हे भांडार लाभले आहे. त्या परंपरेचा मी एक लहानसा भाग आहे. जे वेद, पुराण आणि ऋषीमुनींनी दिले आहे, तेच पुढे नेण्याचे काम करत आहे. आम्ही संशोधन सुरू केले आहे. येथे मर्यादित न ठेवता जगभर सुरु आहे. यातून सुमारे सव्वा लाख पानांचा ग्रंथ तयार होत आहे. यातून पुढच्या पिढीला आयुर्वेद समजण्यास खूप मदत होईल, असे आचार्य बाळकृष्ण यांनी यावेळी सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"