मुख्यमंत्र्यांचे खलपांवर अस्त्र; प्रसंगी म्हापसा अर्बनची फाईल खुली करण्याचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2024 09:19 AM2024-04-19T09:19:56+5:302024-04-19T09:20:57+5:30
आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : म्हापसा अर्बनमध्ये अनेक गोमंतकीयांचे पैसे बुडाले. लोकांना आपल्या कष्टाचे पैसे खलपांच्या कारकिर्दीतच गमवावे लागले. त्यामुळे नेमके किती लोकांचे पैसे बुडाले, याचा त्यांनी हिशोब द्यावा, असा टोला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी लगावत प्रसंगी म्हापसा अर्बनची फाईल खुली करण्याची धमकीच दिली आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची धुमाळी सुरू असताना आता भाजपने खलपांची कोंडी करण्यासाठी हे अस्त्र बाहेर काढल्याची चर्चा आहे.
म्हापसा अर्बन बँकेमध्ये ठेव ठेवलेल्यांचे पैसे बुडविणाऱ्यांनी श्रीपाद नाईक यांना आव्हान देण्याच्या भानगडीत पडू नये. ठेवीदारांना आणि भागधारकांना दुःख देणाऱ्यांना वेळच धडा शिकविण्याची वेळ आली आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. दरम्यान, या प्रकरणात त्यांच्यावर कारवाई का करीत नाहीत? असे विचारले असता मुख्यमंत्री म्हणाले की, गरज पडली तर या प्रकरणाची फाईल पुन्हा खुली करून चौकशी केली जाईल.
खलप यांच्या प्रत्येक मुद्द्यावर डिबेट करायला मी स्वतः तयार आहे, असे प्रतिआव्हानच मुख्यमंत्र्यांनी दिले. नाईक यांनी एक खासदार व मंत्री म्हणून गोव्यासाठी काय केले हे सांगावे. आपल्याबरोबर खुल्या डिबेटला यावे, असे आव्हान खलप यांनी दिले होते. यावेळी पत्रकार परिषदेला केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्यासह दक्षिण गोव्याच्या उमेदवार पल्लवी धेपे, प्रदेशाध्यक्ष खासदार सदानंद शेट तनावडे उपस्थित होते. दोन्ही जिल्ह्यांत यंदा भाजपचाच उमेदवार जिंकत असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला आहे.
खलप यांनी केंद्रीय मंत्री नाईक यांना आव्हान देण्याच्या फंदात पडूच नये. त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आपल्याकडे आहे. त्यांना जे काही विचारायचे असेल ते आपल्याला विचारू शकतात. केवळ अलीकडे आपण जरा व्यस्त असल्यामुळे वेळ मिळत नाही. परंतु गोव्यातील निवडणुका झाल्यानंतर आपल्याकडे वेळ उपलब्ध असेल. त्यामुळे ७ मे नंतर केव्हाही ते आपल्याला खुल्या चर्चेसाठी बोलवू शकतात, असे ते म्हणाले. श्रीपाद नाईक यांनी त्यांच्या कार्यकळात राज्यात मोठ्या प्रमाणात प्रकल्प आणले आहेत. त्यामुळे त्या कारकिर्दीवर बोट ठेवणाऱ्यांनी आधी स्वतः केलेले घोटाळे पाहावे, असेही ते म्हणाले.
सरदेसाई हे गोव्याचे 'कटप्पा'
आमदार विजय सरदेसाई यांनी भाजपाच्या पाठीत खंजीर खुपसला. त्यावेळी आपण माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांना पाठिंबा दिला होता, असे सांगितले. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना पाठिंबा दिला. त्यांना भाजपाने काढून टाकल्यानंतर आता ते काँग्रेसला पाठिंबा देत आहेत. परंतु, ते काँग्रेस पक्षाच्या पाठीत कधी सुरा खुपसतील, हे सांगता येणार नाही. त्यामुळे सरदेसाई हे गोव्याचे 'कटप्पा आहेत, असा टोला आरजीचे आमदार विरेश बोरकर यांनी काल लगावला.