संघर्षावर मुख्यमंत्रीच तोडगा काढणार; सभापती तवडकर-मंत्री गावडे यांच्यातील वाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2024 07:04 AM2024-05-31T07:04:14+5:302024-05-31T07:05:26+5:30
प्रदेशाध्यक्षांनीही घातले लक्ष
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे आणि सभापती रमेश तवडकर यांच्यातील संघर्ष मिटल्याचे वरवर दिसत असले तरी वाद शमला नसून धुमसतोच आहे. यावर आता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हेच तोडगा काढणार आहेत. मुख्यमंत्री सावंत हे उद्या, शनिवारी उत्तराखंडमधून गोव्यात परतणार आहेत. त्यानंतर त्यांची मंत्री गावडे यांच्याशी बैठक होईल, असे पक्ष सुत्रांनी काल सांगितले.
या दोन्ही नेत्यांमध्ये संघर्षाची ठिणगी उडाल्यानंतर गावडे यांनी आक्रमक भूमिका घेतली. काणकोणचे आमदार तवडकर यांनी उघड संघर्षाची भूमिका घेतलेली नाही. पण दोघेही अप्रत्यक्षरित्या एकमेकांस उत्तर देत आहेत. प्रियोळ मतदारसंघात तवडकर हे माजी मंत्री दीपक ढवळीकर यांच्यासोबत लोकांना घरे बांधून देतात हा वादाचा मुद्दा झाला आहे. खाजगीत बोलताना हा संघर्ष तसा संपणार नाही, असे उभय नेतेही सांगतात. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनाही त्याची कल्पना आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी दोन्ही नेत्यांशी चर्चा करण्याचा निर्णय घेतला आहे.
'लोकमत'नेही मुख्यमंत्र्यांना दोन दिवसांपूर्वी विचारले असता, आपण गावडे यांच्याशी बोलेन असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मंत्री गावडेही गोव्याबाहेर होते, त्यामुळे आपण बोलू शकलो नव्हतो, असे मुख्यमंत्री म्हणाले.
निर्णय नाही, पण...
फोंड्यातील प्रेरणा दिन कार्यक्रमात प्रथम मंत्री गावडे यांनी जोरदार विधाने केली होती. आदिवासी कल्याण खात्याच्या अधिकाऱ्यांवर गावडे यांनी शाब्दिक हल्ला केला होता. हे खाते मुख्यमंत्री सावंत यांच्याकडेच आहे. नंतर प्रियोळमधील तवडकर - ढवळीकर युतीचा विषय गाजू लागला. यापुढे मंत्रिमंडळाची फेररचना झाली तर गावडे यांचे मंत्रीपद जाईल व तवडकर यांची त्या जागी वर्णी लागेल अशी चर्चा मंत्र्यांमध्ये सुरू आहे. पण मुख्यमंत्र्यांनी तसा कोणताही निर्णय घेतलेला नाही. वाद वाढू न देणे हे गावडे यांच्या हिताचे ठरेल, अशी चर्चा काही आमदारांमध्ये आहे.