बेरोजगार युवकांना नोक-या हव्यात, मुख्यमंत्री तोडगा काढतील : विश्वजित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2019 08:40 PM2019-12-02T20:40:03+5:302019-12-02T20:40:07+5:30
राज्यातील शिक्षित बेरोजगार युवकांना नोक-यांची गरज आहे.
पणजी : राज्यातील शिक्षित बेरोजगार युवकांना नोक-यांची गरज आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी याविषयी माझी चर्चा झाली आहे व ते 31 डिसेंबरनंतर तोडगा काढतील, असा विश्वास आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी सोमवारी येथे व्यक्त केला.
आपल्या आरोग्य खात्यासह अन्य खात्यांनाही ज्यादा कर्मचारी वर्गाची खूप गरज आहे. त्यासाठी नोकर भरती व्हायला हवी. आपण मुख्यमंत्री सावंत यांच्याशी याविषयी चर्चा केली आहे. बेरोजगार युवक नोक-या मागतात. आम्ही 31 डिसेंबरपर्यंत प्रतीक्षा करायला हरकत नाही. डिसेंबरनंतर किंवा तत्पूर्वी मुख्यमंत्री तोडगा काढतील, असे मंत्री राणे म्हणाले.
सेझ जमिनींचा लिलाव
सेझ कंपन्यांविरुद्ध जो एफआयआर पूर्वी नोंद करण्यात आला होता, तो एफआयआर रद्द करावा, कारण आता जमिनी परत मिळाल्या आहेत. जमिनी मिळाल्यानंतर एफआयआर रद्द करावा, असा निर्णय मनोहर पर्रीकर यांच्या मंत्रिमंडळाने यापूर्वीच घेतला होता. आता त्याविषयी कायदा सल्ला घेण्यासाठी फाईल ऍडव्होकेट जनरलांकडे पाठवली जाईल, असे उद्योगमंत्री या नात्याने बोलताना राणे यांनी सांगितले. सेझ जमिनींपैकी पाच लाख चौरस मीटर जमिनीचा लिलाव झाला तरच आयडीसीला कर्ज फेडणे शक्य होईल. अन्यथा पुढील मार्च महिन्यापासून दर महिन्याला साडेतीन कोटींचा हप्ता बँकेत जमा करण्याची वेळ आयडीसीवर येईल. लिलावाच्या विषयावरही ऍडव्हकेट जनरलांकडून कायदेशीर सल्ला मागण्यात आला आहे, असे राणे यांनी सांगितले.
म्हादईप्रश्नी मुख्यमंत्र्यांवर विश्वास
दरम्यान, म्हादई पाणीप्रश्नी मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे निश्चितच तोडगा काढतील. मुख्यमंत्री आणि केंद्र सरकार मिळून गोव्याला न्याय देतील. आमचा मुख्यमंत्र्यांवर त्याबाबत पूर्ण विश्वास आहे, असे राणे म्हणाले. म्हादई नदी ही सत्तरी तालुक्याला जास्त जवळची आहे. ज्या काही व्यक्तींनी कधी म्हादई नदी पाहिलेलीच नाही, त्या व्यक्ती सत्तरीत येतात व म्हादई नदीवरून आंदोलन करण्याचा प्रयत्न करतात. सत्तरीच्या लोकांनी त्या आंदोलकांना मुळीच प्रतिसाद दिलेला नाही. म्हादईच्या पाण्याचा विषय काही जण राजकारण करण्यासाठी वापरत आहेत. अशा राजकारण्यांना गोमंतकीयांचा पाठिंबा मिळणार नाही, असेही राणे यांनी नमूद केले.