‘क्यार’ चक्रीवादळामुळे समुद्रात अडकलेल्या मच्छिमारांची सुटका करून तटरक्षक दलाचे जहाज किनाऱ्यावर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2019 11:27 PM2019-10-28T23:27:23+5:302019-10-28T23:28:27+5:30
‘क्यार’ चक्रीवादळाच्या काळात खोल समुद्रात मासे पकडण्यासाठी गेलेल्या मासेमारी ट्रोलरवरील ९ कामगारांचा जीव धोक्यात असल्याचे तटरक्षक दलाला जाणवताच त्यांना सुखरूप बचाविल्यानंतर सोमवारी (दि.२८) मुरगाव बंदरात घेऊन दाखल झाले.
वास्को - ‘क्यार’ चक्रीवादळाच्या काळात खोल समुद्रात मासे पकडण्यासाठी गेलेल्या मासेमारी ट्रोलरवरील ९ कामगारांचा जीव धोक्यात असल्याचे तटरक्षक दलाला जाणवताच त्यांना सुखरूप बचाविल्यानंतर सोमवारी (दि.२८) मुरगाव बंदरात घेऊन दाखल झाले. ‘क्यार’ चक्रीवादळाच्या काळात खोल समुद्रात मासेमारी बांधवांच्या सुरक्षेसाठी तटरक्षक दलाच्या गोवा विभागाच्या ‘आयसीजीएस सम्राट’ जहाजाला तैनात करण्यात आले असून २६ व २७ आॅक्टोंबर अशा दोन दिवसात त्यांच्याकडून ९ मासेमारी कामगारांना बचावण्यात आल्याची माहीती दलाने प्रसिद्ध पत्रकाद्वारे दिली आहे.
‘क्यार’ चक्रीवादळाचा दणका मागच्या दोन दिवसात गोव्यालाही विविध माध्यमाने बसला असून यामुळे गोव्यातील अनेक वृक्षे कोसळणे अशा विविध घटना घडल्या होत्या. ह्या चक्रीवादळामुळे खोल समुद्रात मासे पकडण्यासाठी ट्रोलर्स अथवा नौका घेऊन गेलेल्या मासेमाऱ्यांना धोक्यातून सुखरूप रित्या बचावून आणण्यासाठी तटरक्षक दलाच्या ‘आयसीजीएस सम्राट’ ह्या जहाजाला गेले काही दिवस खोल समुद्रात तैनात करण्यात आले होते. २६ व २७ आॅक्टोंबर असे दोन दिवस ‘क्यार’ चक्रीवादळामुळे समुद्रातील वातावरण एकदम खराब झाले होते. खोल समुद्रात मासे पकडण्यासाठी गेलेल्या ‘स्वर्ण ज्योती’ व ‘गंगा गणेश’ नावाच्या दोन भारतीय मासेमारी ट्रलर्सवरील मासेमारी कामगारांचा जीव धोक्यात आल्याचे तैनात करण्यात आलेल्या तटरक्षक दलाच्या जहाजावरील जवानांना दिसून आले. त्यांनी यावेळी कुठल्याच गोष्टीचा विचार न करता ‘क्यार’ चक्रीवादळामुळे खवळलेल्या समुद्राच्या ल्हाटांना तसेच वादळी वा-याला सामोरे जात जवान जहाजासहीत सदर मासेमारी ट्रोलर्ससमोर पोचले. ह्या ट्रोलर्सवर एकूण ९ कामगार असून त्यांचा जीव धोक्यात असल्याचे समजताच नंतर त्यांना त्या मासेमारी ट्रोलर्सवरून तटरक्षक दलाच्या ‘सम्राट’ जहाजावर सुखरूप रित्या घेऊन त्यांचा जीव बचावण्यात आला.
२६ व २७ अशा दोन दिवसात दोन मासेमारी ट्रोलर्सवरील ९ कामगारांना सुखरूप रित्या बचाविल्यानंतर तसेच ‘क्यार’ चक्रीवादळाचा येथे निर्माण झालेला धोका दूर झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सोमवारी (दि.२८) दुपारी १.३० वाजता तटरक्षक दलाचे ‘आयसीजीएस सम्राट’ जहाज त्यांना घेऊन गोव्याच्या मुरगाव बंदरात दाखल झाले. देशाच्या किनारपट्याच्या सुरक्षेबरोबरच खोल समुद्रात जीव धोक्यात असलेल्यांना बचावण्याचे तटरक्षक दलाचे असलेले ध्येय त्यांनी ‘क्यार’ चक्रीवादळामुळे धोक्यात असलेल्या ९ कामगारांचा जीव बचावून पुन्हा एकदा पूर्ण केले.