घरांची पडझड, २ लाखांची मदत देणार; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची विधानसभेत घोषणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2024 09:38 AM2024-07-20T09:38:29+5:302024-07-20T09:39:08+5:30
आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत अर्थसाह्य करणार
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राज्यात पाऊस तसेच इतर नैसर्गिक आपत्तीमुळे जर कुणाच्या घराचे किंवा फ्लॅटचे नुकसान झाले तर संबंधितांना आपत्ती व्यवस्थापनाअंतर्गत प्रत्येकी २ लाख रुपयांची आर्थिक मदत केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत दिले.
राज्यात पडणाऱ्या सततच्या पावसामुळे लोकांच्या घरांना हानी पोहोचत आहे. या लोकांना मदत करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाअंतर्गत निधीची तरतूद असली तरी ती वेळेत मिळत नाही. सरकारने या प्रश्नी लक्ष घालावे, अशी चिंता मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनी प्रश्नोत्तर तासात विधानसभेत व्यक्त केली होती. त्यावर मुख्यमंत्र्यांनी हे आश्वासन दिले.
आमदार आमोणकर म्हणाले, पावसामुळे सध्या मुरगाव प्रमाणेच राज्याच्या अन्य भागांमध्येही दरडी कोसळून काहींच्या घरांचे नुकसान होत आहे. मुरगावमध्येच मागील दोन वर्षात आठ वेळा दरड कोसळली. या लोकांना नुकसानभरपाई मिळावी म्हणून आपण प्रयत्न करीत आहे. या विषयीच्या आपण व्यवस्थापनाकडे आठ फाइल्स मंजुरीसाठी पाठवल्या होत्या. मात्र, त्या आपत्ती व्यवस्थापनाकडे प्रलंबित असून मंजूर झालेल्या नाहीत. नुकसानीचा आकडा निश्चित करणे बाकी असल्याची कारणे दिली जातात. प्रत्यक्षात ही मदत प्राधान्याने मिळणे अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.
निधीत वाढ करणार
मुख्यमंत्री म्हणाले, की सरकार अटल आसरा योजनेंतर्गत घरे बांधण्यासाठी सरकार अडीच लाखांपर्यंत निधी देते. सरकार या निधीत वाढ करेल. पाऊस तसेच नैसर्गिक आपत्तीत जर घर पडले असेल किंवा मोठे नुकसान झाले असेल तर किती नुकसान झाले, याआधारे आपत्ती व्यवस्थापनाअंतर्गत प्रत्येकी २ लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत मिळेल, असे त्यांनी सांगितले.
मागील वर्षीचीही प्रलंबित रक्कम देऊ
मुख्यमंत्री म्हणाले, पावसामुळे ज्या शेतीचे, कुळाघरांचे नुकसान झाले आहे, त्या शेतकऱ्यांना दोन महिन्यांत म्हणजेच गणेश चतुर्थीपूर्वी भरपाई दिली जाईल. ही रक्कम शेतकयांच्या बँक खात्यात थेट जमा केली जाईल. कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून यासंबंधीचे अर्ज जाऊन भरून घेतील. मागील वर्षाचीसुद्धा जर कुणाची नुकसानभरपाई देणे प्रलंबित असेल तर तीसुद्धा दिली जाईल, असे त्यांनी सांगितले.
चतुर्थीपूर्वी शेतकऱ्यांना नुकसानभरपाई
पावसामुळे ज्या शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान झाले आहे त्याचे सर्वेक्षण केले जाईल. गणेश चतुर्थीपूर्वी या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नुकसानभरपाईची रक्कम जमा होईल, असे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गुरुवारी लक्षवेधी सूचनेवेळी विधानसभेत दिले.
आमदार अॅड. कार्ल्स फेरेरा यांनी राज्यात पावसामुळे शेतीचे नुकसान झाल्याने या शेतकऱ्यांना लवकरात लवकर भरपाईची रक्कम मिळावी, अशी लक्षवेधी सूचना मांडली होती. अॅड. फरेरा म्हणाले, पावसामुळे शेतात पाणी साचल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. बांध फुटले आहेत. यामुळे चांगले उत्पन्न मिळेल याकडे लक्ष लावून असलेल्या शेतकऱ्यांना फटका बसला आहे. सरकारने या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी रक्कम थेट बँक खात्यात जमा करणार त्यांनी केली.
आमदार वीरेश बोरकर म्हणाले, सांतआंद्रेतही पावसामुळे शेती पाण्याखाली गेली आहे. मात्र, कृषी खात्याअंतर्गत असलेला निधी कमी झाला आहे. शेतकऱ्यांचे जर १ लाखाचे नुकसान झाले असेल तर नुकसानभरपाई म्हणून त्यांना फार कमी रक्कम मिळते. या रकमेसाठीही त्यांना वारंवार कृषी खात्याच्या कार्यालयात फेऱ्या माराव्यात लागतात असे त्यांनी सांगितले,
१२ तालुक्यांचे लवकरच सर्वेक्षण
कृषिमंत्री रवी नाईक म्हणाले, कौ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर भरपाई मिळावी यासाठी प्रयत्न असेल. जेणे करून त्यांना पुन्हा एकदा लागवड करता येईल. त्यासाठी राज्यातील सर्व १२ तालुक्यांमध्ये शेतीचे किती नुकसान झाले याचे सर्वेक्षण खात्याकडून केले जाईल असे त्यांनी सांगितले.